। मुंबई । प्रतिनिधी ।
लाडकी बहिण योजनेसारख्या माध्यमातून महिलांना 1500 रुपये दिले म्हणजे आम्ही महिलांना सुरक्षित केले, आम्ही त्यांचे हितरक्षक आहोत, असे जर सरकार समजत असेल तर ते सरकार समस्त महाराष्ट्राची फसवणूक करत आहे, अशी टीका शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप व महायुती सरकारवर केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, आज जागतिक महिला दिन आहे. आज प्रधानमंत्र्यांनी दिल्लीत महिलांसोबत एक कार्यक्रम ठेवला आहे. आम्ही कसे महिलांचे रक्षक आहोत. महिलांची काळजी घेतो हे दाखवण्यासाठी हे कार्यक्रम घेतले जातात. परंतु, गेल्या काही महिन्यातली महाराष्ट्राची अवस्था पाहिली तर देशातील महिलांवर होणारे अत्याचार महाराष्ट्रात सर्वाधिक आहेत. मंत्री, सरकारी पक्षातील लोकं त्यात सामिल आहेत. पोलिसांवर दबाव आहे. तसेच, लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून महिलांना 1500 रुपये दिले म्हणजे महिला सुरक्षित आहेत, आम्ही महिलांचे हितरक्षक आहोत असे जर सरकार समजत असेल तर हे सरकार समस्त महराष्ट्राची फसवणूक करत आहे, असे राऊत म्हणाले.
पुढे राऊत म्हणाले की, लाडकी बहिण योजनादेखील किती फसवी आहे हेदेखील निवडणूकीनंतर समोर आले आहे. निवडणूकीनंतर हे बहिणींना 2100 रुपये देणार होते. मात्र, आता संबंधित खात्याच्या मंत्री महिला आहेत, त्यांनी ते शक्य नाही सांगितले. ही महिलांची फसवणूक आहे. तसेच, या सरकारने 2100 रुपये द्यायचे कबूल केले असतानाही ते द्यायला तयार नाही. या योजनेतून पाच लाख महिलांची नावं कापली गेली मग योजना फसवी नाही का? असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे.
तसेच, जो महिलांवर जोरजबरदस्ती करतो, धमक्या देतो त्यांच्यासोबत सक्तीने वागत नसाल काय उपयोग? महिलांना जर तुम्हाला ताकद द्यायची तर त्यांना लाडकी बहिण योजनेतून पैसे देऊन होणार नाही. त्याना त्यांचे हक्क, ताकद द्यावे लागणार, असेही संजय राऊत म्हणाले.