शाळेच्या नो पार्किंग फलकालगतच वाहनांचे पार्किंग
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन शहरातील बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवले जात असल्याचे चित्र दररोज पाहायला मिळत आहे. विशेषतः शाळेच्या लगतच किराणा माल घेऊन येणारे मालवाहू ट्रक नो पार्किंग फलकालगतच चुकीच्या दिशेला उभे केले जात असल्याने शहरात वाहतूक कोंडी होत आहे.
शहरातील टिळक रस्त्यावर नगरपरिषद शाळा क्रमांक 1 असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने या परिसरात ‘पुढे शाळा आहे, वाहने सावकाश चालवा’ आणि ‘नो पार्किंग’ असा फलक लावले आहेत. मात्र, या फलकाकडे दुर्लक्ष करून मालवाहतूक करणारे ट्रक आणि टेम्पो शाळेच्या लगत अरुंद रस्त्यावर चुकीच्या दिशेने उभे केले जात आहेत. अवैध पार्किंगमुळे रस्त्यावर अडथळा निर्माण होऊन वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होते. शाळा सुटण्याच्या किंवा भरण्याच्या वेळेत विद्यार्थी रस्त्यावरून ये – जा करीत असतात, या उभ्या वाहनांच्या बाजूने येणाऱ्या इतर वाहनांमुळे अपघाताची शक्यता वर्तवली जाते. स्थानिक नागरिक आणि पालकांकडून तक्रारी होत असूनही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. संबंधित व्यापारी आणि वाहन चालकांकडून ‘नो पार्किंग’ फलकाचा अवमान होत आहे. पोलीस प्रशासनाने आणि नगरपालिकेने या गंभीर बाबीची तातडीने दखल घेऊन, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करावी आणि शाळेसमोरील रस्ता रहदारी साठी सुरक्षित करावा, अशी मागणी होत आहे.
कारवाईची मागणी
रस्त्यालगत बसणारे भाजी विक्रेते, मच्छी विक्रेत्या महिला तसेच अनधिकृत फेरीवाल्यांवर वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याने प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी. त्याचप्रमाणे प्रशासनाने भेदभाव न करता, धनदांडग्या व्यापाऱ्यांवर ही कडक कारवाई करावी. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र वेळ आणि नियमावली लागू करण्यात यावी, जेणेकरून शहरातील वाहतूक सुरळीत होईल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
श्रीवर्धनमध्ये वाहतुकीची कोंडी रोखण्याकरिता नगरपालिका प्रशासन हे पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने सकारात्मक पावले उचलीत आहे. त्या संदर्भात दोन्ही विभागाची बैठक होऊन ठोस निर्णय घेण्यात आलेला आहे. लवकरच शहरातील वाहतुकीची समस्या मार्गी लागेल.
ॲड. अतुल चौगुले
नगराध्यक्ष







