श्रीवर्धन शहरात चोरांच्या अफवांना ऊत

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; रात्रीच्या पोलीस बंदोबस्तात वाढ

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

श्रीवर्धनमध्ये मागील महिन्यामध्ये तीन घरपोडीच्या घटना घडल्या होत्या. या घटनांचा पोलीस तपास सुरू आहे. मात्र तेव्हापासून श्रीवर्धन शहरामध्ये वारंवार चोर आल्याच्या अफवा पसरत आहेत. रात्रीच्या वेळी नागरिक हातामध्ये काठ्या, सोटे घेऊन पहारा देत आहेत. सदर चोरीच्या अफवांबाबत रायगडचे अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवतारे यांनी श्रीवर्धन येथे नागरिकांची बैठक आयोजित केली. यावेळी अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले. परंतु, याच अफवांचा फायदा घेऊन कोणीतरी खोडसाळ व्यक्ती विनाकारण नागरिकांच्या घरावर खडा फेकून मारणे, दरवाज्याची कडी वाजवणे, असे प्रकार सातत्याने घडत आहेत. त्यामुळे चोर आल्याची बोंबाबोंब अजून जोर धरत आहे.

श्रीवर्धन शहरातील काही सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती हातात लोखंडी सळी घेऊन तोंडावरती मास्क चढवून फिरताना दिसून आला आहे. सदर व्यक्ती सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसल्यानंतर तो नवी पेठ परिसराकडे पळून जाताना दिसला आहे. आणि लगेचच तिथून एक रिक्षा रात्री दोन वाजून 40 मिनिटांच्या सुमारास गेलेली सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे. मात्र सदर सीसीटीव्हीत दिसणारी व्यक्तीने पूर्णपणे आपला चेहरा मास्क लावून झाकून घेतला असल्यामुळे सदर व्यक्तीची ओळख पटवणे कठीण झाले आहे. पोलिसांकडून रात्रीच्या गस्तीमध्ये वाढ करण्यात आली असली तरी कोणत्या ना कोणत्या भागामध्ये चोर आल्याची बोंबाबोंब पसरते. जर चोराला चोरी करायची असेल तर तो कुणाच्या घरावरती खडे फेकून मारणार नाही किंवा दाराची कडी देखील वाजवणार नाही.

परंतु सध्या सुरू असलेले हे प्रकार थांबवण्यासाठी पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्याची आवश्यकता आहे. अनेक ठिकाणी चोर पाहिला, चोर पाहिला अशाप्रकारे सांगितले जाते. परंतु तो कोणी पाहिला याबाबत कोणीही ठामपणे सांगताना आढळून येत नाही. किंवा पोलीस ठाण्यात जाऊन त्याबाबत तक्रारही देत नाही. केव्हा मोबाईल फोन करून अथवा सांगोसांगी चोर दिसला चोर दिसला, अशी चर्चा करण्यात येते. एकूणच चोर आल्याच्या अफवेमुळे राजकीय चर्चांना देखील उधाण आले आहे.

श्रीवर्धन शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या बदलण्यात आल्या. या जलवाहिन्या व जलशुद्धीकरण प्रकल्पाच्यामध्ये अनेक त्रुटी असल्यामुळे जलवाहिन्या वारंवार फुटतात. त्यावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी अशा प्रकारे चोरांच्या अफवा पसरवल्या जात असल्याबाबत नगरपरिषदेतील शिवसेनेच्या गटनेत्यांनी फेसबुक पोस्ट केलेली पाहायला मिळते. तरी रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी जनतेमधून केली जात आहे.

Exit mobile version