| पोलादपूर | प्रतिनिधी |
तालुका पंचायत समितीच्या चार आणि रायगड जिल्हा परिषदेच्या दोन जागांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीचे आरक्षण जाहिर झाल्यानंतर पोलादपूर तालुक्यातील 20 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठीही आरक्षण जाहिर करण्याचा कार्यक्रम शुक्रवारी घेण्यात आला.
तालुक्यातील साधारणपणे 16-20 ग्रामपंचायतींमधील आरक्षण असलेल्या जागांवर उमेदवार न देता जागा पाचही वर्षे रिक्त राहण्याची परंपरा अस्तित्वात आहे. नगरपंचायत पोलादपूरच्या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी उमेदवारांची अनामत रक्कम भरून घेतल्यानंतर नागरिकांचा मागासप्रवर्ग आरक्षण रद्द झाल्याने आरक्षणाचे रक्षण न झाल्याचे दिसून आले आहे.
आता पोलादपूर पंचायत समितीच्या चार जागांसाठी गोवेले नागरिकांचा मागास प्रवर्ग, देवळे सर्वसाधारण स्त्री, लोहारे सर्वसाधारण स्त्री आणि कोंढवी सर्वसाधारण असे आरक्षण जाहिर झाले आहे तर रायगड जिल्हा परिषदेच्या दोन जागांपैकी लोहारे सर्वसाधारण आणि देवळे सर्वसाधारण महिला असे आरक्षण जाहिर झाले आहे.
मात्र, दुसर्याच दिवशी सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणविनाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची भूमिका स्पष्ट केल्याने पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे आरक्षण किती टिकणार, याबाबत साशंकता निर्माण झाली असून या पार्श्वभूमीवर पोलादपूर तालुक्यातील भोगाव खुर्द, बोरघर, चांभारगणी बुद्रुक, धामणदिवी, दिविल, गोळेगणी, कालवली, कापडे खुर्द, बोतवाल बुद्रुक, कोतवाल खुर्द, लोहारे, ओंबळी, पैठण, पार्ले, परसुले, तुर्भे बुद्रुक, तुर्भे खोंडा, उमरठ आणि वझरवाडी या ग्रामपंचायतींच्याही निवडणुका जाहिर होणार असल्याने आरक्षण जाहिर करण्यासाठी गुरूवारी विशेष ग्रामसभांचे आयोजन ठिकठिकाणी केले असल्याने पोलादपूर तालुक्यातील आरक्षणांचे रक्षण कोण करणार, असा सवाल यानिमित्ताने निर्माण झाला आहे.







