ओले काजुगर खरेदीसाठी लगबग

| सुधागड-पाली | वार्ताहर |

ओले काजू गर म्हंटले कि सगळ्यांच्याच जिभेला पाणी सुटते. सध्या जिल्ह्यात या ओल्या काजू गराचा हंगाम बहरला आहे. बाजारात मुबलक प्रमाणात आणि परिपक्व ओले काजूगर उपलब्ध झाले आहेत. परिणामी खवय्यांची खरेदीसाठी लगबग सुरू आहे.

गेल्यावर्षी चक्रीवादळात बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र तरी देखील यावर्षी उत्पादन चांगले मिळत आहे. काजुचे फळ तयार होण्यापुर्वी येणारी बी काढून त्यातील गर काढला जातो. त्याची भाजी करुन खाल्ली जाते. आदिवासी महिला हा रानचा मेवा मुबलक प्रमाणात विकायला घेवून येत आहेत.

जिल्ह्यातील निसर्ग सौदर्याने नटलेला डोंगराळ भाग व जंगलामध्ये काजुची झाडे विपुल प्रमाणात आहेत. तसेच अनेक बागायतदारांच्या स्वतःच्या खाजगी काजुच्या बागा देखिल आहेत. जानेवारीच्या शेवटच्या आठवडयापासून या झाडांवर काजुच्या बिया येवू लागल्या आहेत. आणि या काजुच्या बिया तोडून काजूगर आदिवासी महिला बाजारात विकण्यासाठी घेवून येत आहेत. सुधागड तालुक्यासह श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, महाड, अलिबाग यासह इतर तालुक्यात काजूगर शेकड्याने मिळतात. तर रोहा, सुधागड आदी तालुक्यात अर्धे काजूगर वाट्यावर मिळतात. तर 250 ते 300 रुपये शेकड्यांनी मिळत आहे. तर 75 ते 80 रुपयांना 5 वाटे काजूगर मिळत आहेत. मे महिन्यापर्यंत ओल्या काजुच्या बियांचा हंगाम सुरु असतो. काजुच्या बिया विकून आदिवासींच्या हाती चांगले पैसे देखिल मिळतात. पण यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते.

Exit mobile version