एस. एन. डी. टी. महाविद्यालयाचा अजब कारभार

लिव्हिंग सर्टिफिकेटसाठी विद्यार्थ्यांची परवड; प्रशासनाचे गंभीर बाबीकडे पूर्णपणे दुर्लक्ष

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ मुंबई संचलित महर्षी कर्वे आदर्श महिला महाविद्यालयाचा बेजबाबदार कारभार समोर आला असून, विद्यापीठाच्या नाकर्तेपणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागेवर पर्यायी व्यवस्था न केल्याने, तृतीय वर्षाच्या उत्तीर्ण विद्यार्थिनींना अद्याप ‘लिव्हिंग सर्टिफिकेट’ मिळालेले नाही. स्वाक्षरी करण्यासाठी प्राचार्य नसल्याने विद्यार्थिनींना मनस्ताप सहन करावा लागतो आहे.

एस. एन. डी. टी. महाविद्यालयाचे प्राचार्य गेल्यावर्षी सेवानिवृत्त झाले होते. परंतु, काही महिन्यांसाठी त्याच निवृत्त प्राचार्यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. काही महिन्यांपुरतीच नियुक्ती करण्यात आलेले प्रभारी प्राचार्यांनी पदभार सोडल्यानंतर त्या जागेवर प्राचार्यांची नवनियुक्ती करणे किंवा स्वाक्षरीचे अधिकार अन्य वरिष्ठ प्राध्यापकांकडे सोपवणे गरजेचे होते. मात्र, महाविद्यालय प्रशासनाने या गंभीर बाबीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. सध्या तृतीय वर्षाचा निकाल लागून विद्यार्थिनी पुढील शिक्षणासाठी वेगवेगळ्या संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, प्रत्येक ठिकाणी मूळ लिव्हिंग सर्टिफिकेटची मागणी केली जात आहे. नियोजनाच्या अभावामुळे आमचे वर्ष वाया गेले तर आमचे शैक्षणिक नुकसान कोण भरून देणार अशी प्रतिक्रिया विद्यार्थीनी व्यक्त करीत आहेत. या गंभीर प्रकरणाची दखल विद्यापीठ प्रशासन आणि उच्च शिक्षण विभागाने तात्काळ घेणे गरजेचे आहे. श्रीवर्धन एस. एन. डी. टी. प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात तात्काळ स्वाक्षरीचे अधिकार कोणाकडे तरी सुपूर्द करून येत्या चौवीस तासांत विद्यार्थ्यांना दाखले वाटप करावेत अशी पालकांनी मागणी केली आहे.

प्रवेशाचा मुदत काही दिवसांवर
पुढील शिक्षणासाठी किंवा इतर कोर्सेसची प्रवेश घेण्याची अंतिम मुदत अवघ्या काही दिवसांवर आली आहे. ऑनलाईन फॉर्म भरताना किंवा कागदपत्र पडताळणीच्या वेळी दाखला सादर न केल्यास प्रवेश रद्द होऊ शकतो. या मानसिक त्रासामुळे विद्यार्थिनी हवालदिल झाल्या आहेत.
Exit mobile version