। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी मंगळवारी भारतीय संघाची निवड होत असताना अनेक मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. यावेळी उपकर्णधार म्हणून ऋषभ पंतच्या भवितव्याबाबत चर्चा केली जाण्याची दाट शक्यता आहे. कसोटी संघात मोठे बदल अपेक्षित नसले तरी पंतला फलंदाजीवर लक्ष केंद्रित करता यावे, यासाठी निवड समिती त्याला उपकर्णधारपदापासून दूर करण्याबाबत विचार करू शकेल, असे समजते.
गेल्या वर्षी रोहित शर्माने निवृत्ती जाहीर केल्यानंतर कसोटी संघाच्या नेतृत्वाची धुरा शुभमन गिलकडे सोपवण्यात आली होती, तर उपकर्णधार म्हणून पंतची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, अतिरिक्त जबाबदारीचा त्याच्या यष्टिरक्षण आणि विशेषत: फलंदाजीवर विपरित परिणाम होत असल्याचे चित्र आहे. ‘आयपीएल’च्या गेल्या दोन हंगामांत लखनऊ सुपर जायंट्सचे नेतृत्व करताना पंतने निराशाजनक कामगिरी केली आहे. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये गुवाहाटी येथे झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात गिलच्या अनुपस्थितीत पंतने भारताचे कर्णधारपद भूषवले होते. त्या सामन्यात भारताला तब्बल 408 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. पंतला 7 आणि 13 धावाच करता आल्या होत्या.
पंतसारख्या फलंदाजाला गमाविण्याचा धोका भारतीय क्रिकेट पत्करू शकत नाही. त्याने आपल्या आक्रमक फलंदाजीने संघाला विजय मिळवून दिले आहेत. अतिरिक्त जबाबदारी दिल्यानंतर त्याचा थेट परिणाम पंतच्या फलंदाजीवर दिसून येतो. त्यामुळे त्याला मोकळेपणाने खेळता यावे, यासाठी उपकर्णधारपदाच्या जबाबदारीपासून मुक्त करण्याचा निवड समिती विचार करत आहे, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्राने सांगितले.
पंतची सध्याची लयही निवड समितीसाठी चिंतेचा विषयही ठरू शकते. एकदिवसीय संघात केएल राहुलनंतर दुसऱ्या पसंतीचा यष्टिरक्षक म्हणून त्याच्या स्थानावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ध्रुव जुरेल, संजू सॅमसन आणि इशान किशन यांनी अलीकडच्या काळात विविध प्रारूपांत चमक दाखवल्याने; पंतचे एकदिवसीय संघातील स्थान धोक्यात आले आहे.
सूर्यकुमारच्या भवितव्याविषयीही चर्चा
भारत-अफगाणिस्तानमध्ये ट्वेन्टी-20 मालिका होणार नसली, तरी अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती आणि सचिव देवजित सैकिया यांच्यात ट्वेन्टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवच्या भवितव्याविषयी अनौपचारिक चर्चा होऊ शकते. सूर्यकुमार गेले दीड वर्ष फलंदाजीत संघर्ष करत आहे. कर्णधारपदावरून हटविण्यात आल्यास त्याला केवळ फलंदाज म्हणून संघात स्थान देणे निवड समितीला अवघड जाईल. आगामी आयर्लंड व इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सूर्यकुमारला नेतृत्व करण्याची संधी देऊन त्यातील कामगिरीच्या आधारे त्याच्या भविष्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र, निवड समिती हा पर्याय निवडेलच याची शाश्वती नाही.
