| चिरनेर | प्रतिनिधी |
गेल्या चार दिवसांपासून वाहणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे अरबी समुद्रात मासेमारीसाठी आलेल्या अनेक बंदरातील बोटी पैकी मोरा बंदरात आश्रयासाठी आलेल्या गुजराती मच्छीमार बोटीतून एक खलाशी बेपत्ता झाला आहे. भरतभाई डालकी (44) असे या बेपत्ता खलाशाचे नाव आहे. याची नोंद उरणच्या मोरा सागरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, या बेपत्ता झालेल्या खलाशाचा शोध सुरू आहे. काही दिवसांपूर्वी याच किनाऱ्यावर दुरुस्तीचे काम सुरू असलेल्या बोटीत जाणाऱ्या कारागीराचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
गुजरात राज्यातील वेरावल येथील भरतभाई कचराभाई डरी यांच्या मालकीची भवानी गंगा नावाची मच्छीमार बोट वादळी हवामानाच्या इशाऱ्यानंतर सुरक्षिततेसाठी मोरा बंदरात नांगर टाकून विसावली होती. मंगळवारी (दि.19) मोरा बंदरात आलेल्या या मच्छीमार बोटींवर 6 खलाशी व एक तांडेल असे एकूण सात जण होते. त्यापैकी भरतभाई डालकी हा खलाशी शौचालयाला गेला होता. बराच वेळ झाला तरी बोटीवर दिसून आला नसल्याने त्याचा शोध घेतला. मात्र, कुठेच आढळून आला नाही. त्यामुळे मोरा सागरी पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती वपोनि सुर्यकांत कांबळे यांनी दिली. दरम्यान याप्रकरणी पोलीस व सागरी सुरक्षा रक्षक दलाच्या सदस्यांना बेपत्ता खलाशाचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच गुजराती बोटीवरील खलाशी व तांडेल यांनाही सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे सुचना देण्यात आल्या असल्याची माहिती रायगड मत्स्यव्यवसाय विभागाचे सहआयुक्त संजय पाटील यांनी दिली.
मोरा बंदरातील गुजराती मच्छीमार बोटीतील खलाशी बेपत्ता
