। उरण । प्रतिनिधी ।
कोकण किनारपट्टीवर पुन्हा एकदा वादळाचं संकट घोंघावतंय! खवळलेल्या समुद्रात खोलवर गेलेल्या मासेमारी बोटींपैकी काही बोटी अजूनही बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय कोस्ट गार्डकडून शोधमोहीम सुरू असल्याची माहिती मत्स्यविभाग आयुक्त किशोर तावडे यांनी दिली आहे. अरबी समुद्रात गेल्या काही दिवसांपासून उठलेले वादळ आणि मुसळधार पाऊस या तडाख्यात दोन मासेमारी बोटी भरकटल्या असून, त्यावरील 32 खलाशी बेपत्ता आहेत. कोस्टगार्डच्या मदतीने या बोटींचा शोध घेण्याचे काम सुरू असले तरी अद्यापि त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे खलाशांच्या कुटुंबीयांवर चिंतेचे सावट पसरले आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वातावरण खराब झाले आहे. तसेच वादळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे हवामान विभागाने दिलेल्या धोक्याच्या इशाऱ्यानंतर शनिवारपासून मच्छीमारांना खोल समुद्रात मासेमारीसाठी जाण्यास मनाई करण्यात आली होती. मात्र, वादळाच्या इशाऱ्यापूर्वीच शेकडो मच्छीमार बोटी मासेमारीसाठी खोल समुद्रात गेलेल्या आहेत.
अनेक मच्छीमार बोटींनी विविध बंदरातील किनारा गाठला असला तरी काही मच्छीमार बोटी अद्यापही वादळात अडकून पडलेल्या आहेत. न्हावा येथील सत्यवान पाटील यांच्या मालकीची श्री गावदेवी मरीन व सचिन पाटील यांच्या मालकीची चंद्राई या दोन बोटी गायब झाल्या असून, त्याचा अजूनपर्यंत पत्ता लागलेला नाही. या बोटींच्या शोधासाठी सर्व प्रयत्न सुरू असल्याचे करंजा मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष प्रदीप नाखवा यांनी सांगितले. दरम्यान वादळात अडकलेल्या करंजा-उरण येथील चार मच्छीमार बोटी सुखरूप परतल्या. आता 32 खलाशांचा शोध लावण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. मात्र, आजच्या घडीला मासेमारी करणाऱ्या अनेक बोटी या पारंपरिक पद्धतीने न करता बंदी असलेल्या जनरेटर व एलईडी लावून खुलेआम अधिकारी वर्गाच्या कृपाशिर्वादाने मासेमारी करत आहेत. आपले बिंग फुटू नये म्हणून अधिकारी बेपत्ता बोटींची माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याची चर्चा मच्छीमार बांधवांत सुरू आहे. ते आपल्याला माहिती नसल्याचे सांगून आपली जबाबदारी झटकताना दिसत आहेत. त्यामुळे अशा निष्क्रिय अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांची उचलबांगडी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.





