महाराष्ट्राच्या नसानसात पुरोगामी विचार संतांनी रुजविले

। खोपोली । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र राज्याचा धार्मिक, अध्यात्मिक, सांस्कृतिकसह ज्ञानाचा पाया वारकरी संप्रदाय व संतांनी मजबूत केला आहे. येथील माणसांच्या नसानसांत पुरोगामी विचारांचे बीज संतांनी रुजविले असून, नवीन पिढीला आदर्श जीवनसह यशस्वी आयुष्यासाठी दिशादर्शक बनण्याचे कार्य वारकरी संप्रदाय, विद्यमान कीर्तनकार व संतांनी करावे, असे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
दहावे अखिल भारतीय संत साहित्य संमेलनाचे उद्घाटन बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते शनिवारी झाले. देवन्हावे येथील नोव्हाटेंन इमॅजिका रिसॉर्टच्या सभागृहात हे दोन दिवसीय संत साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या वेळी आ. महेंद्र थोरवे, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष हभप विठ्ठल पाटील, सचिव डॉ. सदानंद मोरे, राज्य कार्यकारणीचे सर्व सदस्य, जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, उपविभागीय अधिकारी अजित नैराळे, तहसीलदार आयुब तांबोळी व राज्यातील वारकरी संप्रदायाचे प्रमुख कीर्तनकार, अभ्यासक उपस्थित होते. कमीत कमी संख्येत कोरोन नियमांचे पालन करून हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
प्रास्ताविक परिषदेचे अध्यक्ष हभप विठ्ठल महाराज पाटील यांनी केले. या संमेलनाचे अध्यक्ष हभप बाळासाहेब महाराज देहूकर यांनी बोलताना वारकरी संप्रदायचा इतिहास, परंपरा व वर्तमान वाटचालीबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी वारकरी संप्रदायमधील सर्वोत्तम धर्म समाजकार्य करणार्‍या वारकर्‍याला देश पातळीवरचा पद्म पुरस्कार देण्याची मागणी केली. यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारकडे पाठपुरावा करेल, अशी ग्वाही थोरात यांनी यावेळी दिली.
सकाळी भव्य ग्रंथ दिंडी, पालखी सोहळा काढण्यात आली. महसूल मंत्री थोरात, आमदार थोरवे यांनी या दिंडीचे स्वागत केले. दोन दिवसीय या संत साहित्य संमेलनात साधू-संत परंपरा, वारकरी संप्रदाय महिलांचे योगदान, तरुण पिढी व वारकरी संप्रदाय, संत नामदेवांचे वारकरी संप्रदायमधील महत्त्व आदी विषयांवर चर्चासत्र ठेवण्यात आले आहेत. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, पालकमंत्री अदिती तटकरे, माजी आमदार सुरेश लाड यांच्या उपस्थितीत या संमेलनाचा समारोप होणार आहे.

Exit mobile version