साजगाव जलजीवन योजना रखडली

ठेकेदाराचा गलथान कारभार; ग्रामपंचायतीचा आंदोलनाचा इशारा

। वावोशी । वार्ताहर ।

साजगाव जलजीवन योजनेचा गोंधळ आणखी वाढला आहे. अपूर्ण व निकृष्ट काम करणार्‍या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे गावकरी संतप्त झाले आहेत. त्यामुळे दोषी ठेकेदाराला तातडीने ब्लॅकलिस्ट करावे, त्याचबरोबर संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात यावी. तसे न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा थेट इशारा साजगाव ग्रामपंचायतीने प्रशासनाला दिला आहे.

एप्रिल 2022 मध्ये मंजूर झालेली जलजीवन योजना जुलै 2023 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, जुलै 2024 मध्ये बांधण्यात आलेली ढेकू साठवण टाकी निकृष्ट दर्जाची असल्याचे स्पष्ट झाले. फेब्रुवारीमध्ये कसेबसे पाणी सारसन फिल्टर प्लांटपर्यंत पोहोचले गेले. तरीही गावकर्‍यांना शुद्ध आणि नियमित पाणीपुरवठा होत नाही. याशिवाय, पाणीपुरवठा योजनेच्या पाइपलाइनचे कामही तांत्रिकदृष्ट्या अपूर्ण ठेवले गेले आहे. नियमानुसार, पाइपलाइन तीन फूट जमिनीच्या खाली असायला हवी, जेणेकरून पाण्याचा प्रवाह आणि दाब योग्य राहील. मात्र, कोणतेही खोदकाम न करता पाइपलाइन थेट जमिनीवर टाकण्यात आली आहे. त्यामुळे ठेकेदाराच्या काम व प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहेत.

ग्रामपंचायतीने वेळोवेळी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाला पत्रव्यवहार केला आहे. मात्र, ठेकेदार दीपेश मोरे उर्फ बबलू मोरे याने कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. याशिवाय, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अधिकार्‍यांनीही दुर्लक्ष केल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. हा ठेकेदार कुणाच्या वरदहस्तामुळे इतका बिनधास्त आहे, यावर ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 17 फेब्रुवारी रोजी झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी जलजीवन योजनेच्या कामाचे ऑडिट करण्याची मागणी केली. कार्यकारी अभियंता आणि जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांनी तातडीने ग्रामपंचायतीसमोर हजर राहून ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थ व ग्रामपंचायत कार्यकारिणीने दिला होता.

ठेकेदारावर कारवाईची मागणी
7 फेब्रुवारी रोजी झालेल्या ग्रामसभेत साजगाव ग्रामपंचायतीने स्पष्ट केले आहे की, दोषी ठेकेदार दीपेश मोरे आणि त्याची कंपनी साईकृपा इंटरप्रायझेसला ब्लॅकलिस्ट करण्यात यावे. तसेच, संबंधित अधिकार्‍यांवर देखील कारवाई करण्यात यावी. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकार्‍यांकडेही पुन्हा तक्रार दाखल करण्यात येत असल्याचे सरपंच विनोद खवळे यांनी सांगितले आहे.

जल जीवन योजनेचा कालावधी एप्रिल 2022 ते जुलै 2023 असा होता. तरी ठेकेदाराने हे काम वेळेत पूर्ण केले नसल्याने ठेकेदाराच्या विरोधात उपोषणाचे पत्र पाणीपुरवठा विभागाला देण्यात आले होते. परंतु, कार्यकारी अभियंता यांनी हे काम 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करू, असे आश्‍वासन दिले होते. परंतु, ते त्यांनी आजतागायत पाळले नाहीत. तसेच, झालेल्या कामाचे ऑडिट व्हावे अशी मागणी केली असून तीनही गावांना लवकरात लवकर पाणी मिळावे ही आमची प्रामाणिक इच्छा आहे.

विनोद खवळे,
सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत साजगाव

साजगाव, सारसन आणि ढेकू नळ पाणीपुरवठा योजनांची कामे जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत प्रगतीपथावर आहेत. सद्यस्थितीत महड येथील उद्धव विहिरीतून सारसन येतील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणीपुरवठा सुरू आहे. तसेच, जलशुद्धीकरण केंद्रापासून ते सारसन येथील उंच साठवण टाकीपर्यंत पाणीपुरवठा सुरू केलेला आहे. इतर प्रलंबित कार्य देखील प्रगतीपथावर आहेत. शिवाय या योजनांकरिता मा. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी देखील डिसेंबर 2025पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

संतोष चव्हाण, उपअभियंता,
राजिप ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग, खालापूर

Exit mobile version