| पाताळगंगा | वार्ताहर |
रायगड जिल्ह्यातील अष्टविनायकांपैकी असलेले महड येथील वरद विनायक गणपती या मंदिराकडे जाणार्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, या मार्गावरुन गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मात्र, हा रस्ता दुरुस्ती करण्यासाठी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. याच ठिकाणी धाकटी पंढरी म्हणून ओळख असलेल्या पाताळगंगा नदीच्या किनार्यावर दशक्रिया विधी होतात. मात्र, असे असले तरीसुद्धा हा रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांना जोडणार्या रस्त्यांची दुरवस्था झाली असून, याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. कामगार, वयोवृद्ध, शाळकरी मुलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे अनेकांना कमरेचा त्रास होत असल्याचे निदर्शनास येत आहे.