रिलायन्स कंपनीतील कामगारांना पगारवाढ

| नागोठणे | वार्ताहर |

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या नागोठणे मॅन्युफॅक्चरिंग डिव्हिजनमध्ये कार्यरत असलेल्या कामगारांना पुन्हा एकदा पगारवाढ मिळविण्यात कामगार संघटना फोरम यशस्वी झाली आहे.

रिलायन्स येथील कामगारांना सिटीसी प्रमाणे सरासरी 16 हजार 500 एवढी भरघोस पगारवाढ झाली आहे. या करारामुळे वेगवेगळे श्रेणीतील कामगारांचे मासिक वेतन रुपये 70 हजार ते सव्वालाख रुपयांच्यावर होणार आहेत. तर, या करारामुळे थकबाकीच्या स्वरूपात कामगारांना लाखोंची लॉटरी लागली असून, अडीच ते तीन लाखांच्या वरील रकमेची थकबाकी कामगारांच्या खात्यात जमा झाली आहे. या कराराची माहिती कामगार संघटना फोरमने बुधवारी (दि.4) रिलायन्सच्या निवासी संकुलातील सभागृहात पत्रकार परिषदेत दिली आहे. 21 मे रोजी रिलायन्स कंपनी व्यवस्थापन व कामगार संघटना फोरमच्यावतीने कंपनीचे वरिष्ठ अधिकारी व कामगार संघटना प्रतिनिधी यांनी वेतनवाढ करारावर सह्या केल्या आहेत. यावेळी रिलायन्स कंपनीच्यावतीने ग्रुप प्रेसिडेन्ट अविनाश श्रीखंडे, प्रेसिडेन्ट शशांक गोयल, इंडस्ट्रिअल रिलेशन प्रमुख चेतन वालंज, एच.आर. प्रमुख गौतम मुखर्जी, निलेश दांडेकर व श्रीकांत गोडबोले यांनी प्रतिनिधीत्व केले. या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कामगार संघटना व कामगार वर्गाकडून मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

Exit mobile version