| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याचे वेतन अजूनही मिळालेले नाही. निधी उपलब्ध असताना वेतन वेळेवर मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे सूर उमटले आहेत.
जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या लिपिकांपासून आरोग्य सेवकांपर्यंत सर्वच कर्मचाऱ्यांचे दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वेतन होते. आरोग्य विभागाकडून अर्थ विभागात, जिल्हा कोषागार कार्यालयात मंजुरीसाठी प्रस्ताव गेल्यावर चार ते पाच तारखेपर्यंत कर्मचाऱ्यांच्या खात्यात त्यांचे वेतन जमा होते. परंतु, महिना संपत आला, तरीही आजपर्यंत जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे वेतन न झाल्याचे समोर आले आहे. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे वेतनाची फाईल पुढे पाठविणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांची बदली बांधकाम विभागासह शिक्षण विभागात झाली आहे. त्यांच्या जागी अजूनपर्यंत एकही कर्मचारी कार्यालयास देण्यात आला नाही. शासनाकडून निधी वेळेवर मिळूनदेखील वेतनाची फाईल कर्मचाऱ्यांअभावी पुढे जात असल्याने आरोग्य सेवकांसह कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले असल्याची माहिती समोर येत आहे. प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराचा फटका आरोग्य कर्मचाऱ्यांच्या महिन्याच्या आर्थिक खर्चावर बसत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची नियुक्ती तातडीने करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांची होत आहे.