| पनवेल | वार्ताहर |
राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा, सुगंधीत तंबाखू, पान मसाल्याची साठवणूक करुन त्याची छुप्या पध्दतीने विक्री करणार्या खारघरमधील 6 दुकान आणि पान शॉपवर अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापे मारुन हजारो रुपये किंमतीचा गुटखा आणि सुगंधीत तंबाखू, पान मसाल्याचा साठा जप्त केला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने या सर्व दुकान आणि पान शॉप चालकांविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करुन सर्वांना ताब्यात घेतले आहे.
राज्य शासनाने गुटखा, सुगंधीत तंबाखू, पान मसाला यासारख्या तंबाखुजन्य पदार्थांच्या उत्पादनांवर, त्याची साठवणूक करण्यांवर तसेच त्याची विक्री आणि वाहतूक करण्यावर बंदी घातली आहे. असे असतानाही नवी मुंबईतील अनेक पान शॉपमधून छुप्या पध्दतीने गुटखा आणि सुगंधीत तंबाखुची विक्री सुरु असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने गुटख्याची विक्री करणार्या पान शॉप आणि टपऱ्यांची झाडाझडती सुरु केली आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत नायडू आणि त्यांच्या पथकाने खारघरमधील 6 दुकाने आणि पान शॉप तसेच टपर्यांवर छापे मारी करुन हजारो रुपये किंमतीचा गुटखा, सुगंधीत तंबाखू आणि पान मसाल्याचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत अंमली पदार्थ विरोधी पथकाने खारघर, सेक्टर-3 बेलपाडा मधील दिव्या कॉर्नर, राजेश टी., आच्छाद कम्युनिकेशन या 3 दुकानांवर छापेमारी केली. त्यानंतर या तिन्ही दुकानांची तपासणी केली असता सदर तिन्ही दुकानांमध्ये हजारो रुपये किमतीचा तंबाखुयुक्त पानमसाला आणि गुटखा आढळून आला. त्यामुळे अंमली पदार्थ विरोधी पथकाने या तिन्ही दुकानात सापडलेला गुटखा आणि सुगंधीत पान मसाल्याचा साठा जप्त केला आहे. तसेच तिन्ही दुकानाचे मालक अनुज भगवानदिन साहु (26), इंद्रा रमेश पाल (35) आणि धनंजय मातादीन गुप्ता (24) या तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाने खारघर मधील कोपरा परिसरातील ब्रम्हांड अपार्टमेंट लगत असलेल्या पानाच्या टपरीवर तसेच खान-पान शॉपवर त्याचप्रमाणे खारघर, सेक्टर- 2 मधील गुरुप्रसाद पान शॉपवर छापे मारुन त्यांची तपासणी केली.
या तिन्ही पान शॉपमध्येदेखील गुटखा आणि सुगंधीत तंबाखू पानमसाला आढळून आला. त्यामुळे अंमली पदार्थ विरोधी पथकाने या तिन्ही टपरी आणि पान शॉपचे मालक प्रमोद वुमार साहु (39), राजू नथ्यु खान (27), सोनु अजयवुमार (23) या तिघांना ताब्यात घेतले. दरम्यान, प्रतिबंधित असलेल्या गुटखा आणि पान मसाल्याची विक्री करणार्या पान शॉप चालकांवर यापुढेदेखील अशाच पध्दतीने कारवाई सुरु राहणार असल्याचे अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.