हायस्पीड डिझेल तेलावरील विक्रीकर

प्रतिपूर्तीसाठी 135 कोटी मंजूर ;आमदार रमेशदादा पाटील यांचा पाठपुरावा

| मुंबई | प्रतिनिधी |

कोकण किनारपट्टीवरील मच्छीमार सहकारी संस्थांसाठी हायस्पीड डिझेल तेलावरील विक्री कराच्या प्रतिपूर्तीसाठी पावसाळी अधिवेशन 2023 मध्ये मत्स्यव्यवसाय विभागामार्फत 135 कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व भाजप आमदार रमेशदादा पाटील यांनी मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले. मच्छीमार सहकारी संस्था व त्यांच्या सभासदांच्या 120 अश्वशक्ती क्षमतेवरील यांत्रिकी नौकांचा बंद करण्यात आलेला डिझेल कोटा गेल्याच वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने सुरू केला आहे परंतु या हायस्पीड डिझेल तेलावरील विक्री कराच्या प्रतिपूर्तीची रक्कम शासनाकडे प्रलंबित होती. त्यामुळे आमदार रमेशदादा पाटील यांच्याकडून विक्री कराच्या प्रतिपुर्तीची रक्कम देण्याकरता सभागृहात वारंवार मागणी करण्यात येत होती. त्याच अनुषंगाने पावसाळी अधिवेशनामध्ये मत्स्यव्यवसाय विभागामार्फत 135 कोटी रुपयांची पूरक मागणी मंजूर करण्यात आली असून यामुळे कोकण किनारपट्टीवरील मच्छिमार बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे.

याबाबत बोलताना आमदार रमेश पाटील यांनी, 120 अश्वशक्तिवरील हायस्पीड यांत्रिकी नौकांच्या डिझेल तेलावरील विक्री कराच्या प्रतिपूर्तीसाठी शासनाकडून 135 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून याचा फायदा जवळपास 85 हजाराहून अधिक मच्छीमार बांधवांना होणार असल्याचे सांगितले. तसेच कोकण किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांना शासनाने दिलासा दिल्याबद्दल राज्य सरकारचे व मत्स्यव्यवसाय मंत्री महोदयांचे कोकण किनारपट्टीवरील सर्व मच्छीमार बांधवांच्या वतीने त्यांनी आभार मानले.

Exit mobile version