। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव तालुका पत्रकार संघाची वार्षिक सभा गुरुवार, दि.3 मार्च रोजी शासकीय विश्रामगृह माणगाव याठिकाणी उत्साहात संपन्न झाली. या सभेत संघाच्या अध्यक्षपदी माणगाव येथील पत्रकार सलीम शेख यांची पाचव्यांदा एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
यावेळी कार्याध्यक्षपदी पत्रकार मजिद हाजिते यांची, तर उपाध्यक्षपदी निलेश म्हात्रे यांची सलग दुसर्यांदा निवड करण्यात आली आहे. संघाचे प्रवक्तेपदी आजेश नाडकर, सचिव देवयानी मोरे, सहसचिव नरेश पाटील, खजिनदार स्वप्ना साळुंके, ज्येष्ठ सल्लागार डॉ. आरिफ पागारकर, सचिन देसाई, प्रभाकर मसुरे, नुरुद्दीन सनगे तर कार्यकारिणी सदस्यपदी दीपक दपके अशी कार्यकारिणी एकमताने निवडण्यात आली आहे.
आपल्या निवडीबद्दल प्रतिक्रिया देताना सलीम शेख यांनी सर्वांचे ऋण व आभार मानीत पत्रकार संघातर्फे आपण आपले कार्य सर्वांच्या सहकार्याने असेच सुरू ठेवू अशी ग्वाही दिली. या सभेत पत्रकार संघाचे ज्येष्ठ सल्लागार डॉ. आरिफ पागारकर यांची इंडियन प्रेस क्लबच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचाही पत्रकार संघातर्फे सत्कार करण्यात आला. शेवटी सचिन देसाई यांनी सर्वांचे आभार मानून सभेची सांगता केली.