पुराच्या पाण्यात मीठ विरघळले!

पेणच्या मिठागरांतील हजारो गोण्या भिजल्या; रायगडच्या पुराचा मिठागरांना मोठा फटका

| रायगड | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यात गेल्या आठ दिवसात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. जिल्ह्यातील मिठागरांना आणि भातखरेदी केंद्रांनाही पूराचा तडाखा बसला आहे. त्यामुळे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात जुलै महिन्यात पहिल्या 10 दिवसात सरासरी 1 हजार 240 मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. ज्यात मोठी जीवित आणि वित्तहानी झाली आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात आत्तापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला असून, पूरस्थितीमुळे करोडो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे पेण तालुक्यातील ग्रामिण भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. भोगावती, बाळगंगा आणि पाताळगंगा नद्यांना पूर आल्याने नदीचे पाणी आसपासच्या गावांमध्ये आणि शेतांमध्ये शिरले होते. मुसळधार पावसाने पेण तालुक्यातील खारेपाट परिसराला मोठा
फटका बसला.

शिर्की येथील दीडशे एकर मिठशेतीचे बांध तुटल्याने हजारो मिठाच्या गोण्या पावसात भिजल्या आहेत. सदगुरु कृपा नाविन्यपूर्ण सहकारी संस्थेच्या माध्यमातून वंदना म्हात्रे आणि कल्पेश पाटील हे दीडशे एकर क्षेत्रावर नैसर्गिक पद्धतीने मीठ उत्पादन करतात. वर्षभर शेकडो कामगारांच्या मेहनतीने तयार झालेले मीठ विक्रीसाठी मिठशेतीच्या बांधांवर प्लास्टिक आच्छादनाखाली साठवून ठेवण्यात आले होते. मात्र, मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मिठशेतीचे बांध उध्वस्त झाले. पावसाचे पाणी साठलेल्या मिठाच्या राशींमध्ये शिरल्याने हजारो गोण्या भिजून मोठे नुकसान झाले.

याच पावसामुळे कल्पेश पाटील यांच्या मत्स्यव्यवसायालाही मोठा फटका बसला आहे. पाण्याचा वेग वाढल्याने मत्स्य तलावातील हजारो मासे पूराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे मोठे आर्थिक संकट त्यांच्या समोर उभे राहिले आहे. गेल्या अनेक वर्षात अशी परिस्थिती कधीही उद्भवली नव्हती हे नुकसान भरून येऊ शकत नसल्याचे कल्पेश पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, शिर्की येथील सद्गुरू कृपा सहकारी भात खरेदी केंद्रात शेतकऱ्यांकडून खरेदी करून साठवून ठेवलेला मोठ्या प्रमाणातील भातही पावसामुळे भिजला आहे. त्यामुळे शेतकरी आणि संस्था दोघांनाही मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे मीठ उत्पादन, मत्स्यव्यवसाय आणि भात साठा अशा तिन्ही क्षेत्रांचे मोठे नुकसान झाल्याने शासनाने तातडीने पंचनामा करून आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी संस्थेचे संचालक कल्पेश पाटील यांनी केली आहे.

Exit mobile version