| नेरळ | प्रतिनिधी |
2 जानेवारी 1943 रोजी ब्रिटिशांच्या गोळीबारात हुतात्मा झालेले कर्जत तालुक्यातील मानिवली येथील हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांच्या 110 व्या जयंतीनिमित्त नेरळ येथील हुतात्मा चौक येथे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी हुतात्म्यांना अभिवादन केले.
हुतात्मा हिराजी पाटील यांचा जन्म 19 जानेवारी 1914 रोजी झाला होता. त्यांच्या 110व्या जयंतीनिमित्त कर्जत तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नेरळ येथील हुतात्मा चौकात असलेल्या हुतात्मा स्मारक येथे येऊन आ. महेंद्र थोरवे यांनी हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्या अर्ध पुतळ्यांना पुष्पहार घालून अभिवादन केले. त्यावेळी नेरळ ग्रामपंचायत सरपंच उषा पारधी, नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे, हुतात्मा स्मारक समितीचे अध्यक्ष संतोष पेरणे, सामाजिक कार्यकर्ते महेश भगत आदी उपस्थित होते. हुतात्म्यांना अभिवादन केल्यानंतर हुतात्मा चौक परिसराची पाहणी करून हुतात्मा स्मारक परिसरात चांगले सुसज्ज गार्डन आणि सुशोभीकरण करण्यासाठी उपलब्ध असलेल्या जागेची पाहणी आ. थोरवे यांनी केली.