संभाजी ब्रिगेड नवी दिशा नवा विचार घेवून जिल्ह्यात काम करणार

दक्षिण रायगड जिल्हाध्यक्षपदी वैभव सुर्वे

पोलादपूर | शैलेश पालकर |

मराठा सेवा संघ प्रणीत संभाजी ब्रिगेडच्या दक्षिण रायगड जिल्ह्याच्या अध्यक्ष पदाची सूत्रे वैभव हरिश्चंद्र सुर्वे यांची निवड ऐतिहासिक किल्ले रायगडावर झालेल्या शाक्त शिवराज्याभिषेक सोहळयाच्या कार्यक्रमात करण्यात आली. जिल्ह्यात नवी दिशा आणि नवा विचार घेवून संविधानिक आधारावर सर्वसामन्य माणसाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल, असे यावेळी वैभव सुर्वे यांनी सांगितले.

मराठा सेवा संघ प्रणीत संभाजी ब्रिगेडच्या वतीने किल्ले रायगडावर छ.शिवाजी महाराजांचा द्वितीय शिवराज्याभिषेक सोहळा साजरा झाला. या सोहळयाला संपूर्ण महाराष्ट्रातून संघटनेचे पदाधिकारी आले असता संभाजी ब्रिगेडची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष शिवश्री सुधीरदादा भोसले यांच्या उपस्थितीत दक्षिण रायगडच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा वैभव हरिश्चंद्र सुर्वे यांच्याकडे देण्यात आली. शेतकरी आघाडीचे संतोष गव्हाणे-पाटील, प्रदेश संघटक प्रदीप कणसे, कोकण विभागीय अध्यक्ष सचिन जगदीश सावंत, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी कोकणात आलेल्या महापुरात ज्या ज्या व्यक्तींनी, संस्थांनी मदतीची मोलाची भूमिका बाजवली त्या व्यक्ती आणि संस्थांचा सत्कार देखील संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आला. महाड शहराच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप-कामत यांना हिरकणी पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. राजसदरेवर मराठा सेवा संघाच्या संभाजी ब्रिगेडच्या दक्षिण रायगड जिल्हाध्यक्षपदी वैभव सुर्वे यांची नियुक्ती करण्यात आली.

किल्ले रायगडावर छ.शिवाजी महाराज यांच्या पावन भूमीत आणि त्यांच्या राजसदरेवर माझी निवड झाल्याने आपण धन्य झालो असून सर्वसामन्य माणसाच्या न्याय हक्कासाठी आपण संविधानिक पध्दतीने कायम पुढे राहू आणि संभाजी ब्रिगेडचा नवी दिशा आणि नवे विचार संपूर्ण जिल्ह्यात पोहोचवण्यास प्रयत्नशील राहू असे यावेळी वैभव सुर्वे यांनी सांगितले.

Exit mobile version