| पुणे | प्रतिनिधी |
तारखेनुसार 6 जून रोजी किल्ले रायगडावर होणारा शिवराज्याभिषेक नामशेष करावा, असे विधान संभाजी भिडे यांनी केले आहे. प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ते बोलले. राज्यात तिथीनुसार आणि तारखेनुसार शिवराज्याभिषेक साजरा केला जातो. परंतु, 6 जून रोजी तारखेनुसार होणारा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा होतो. यावरून तिथीनुसार होणाऱ्या शिवराज्याभिषेकाविषयी पत्रकारांनी विचारलं असता संभाजी भिडे म्हणाले, 6 जूनचा शिवराज्याभिषेक नामशेष केला पाहिजे. 76 वर्षे झाली तरीही आपलं मानसिक अधिष्ठान ब्रिटिशांकडे स्वाधीन ठेवले आहे. महाराजांचा राज्याभिषेक झाला, त्या तिथीप्रमाणेच शिवराज्याभिषेक स्मरण दिन केला पाहिजे. 6 जूनचा बंद केला पाहिजे.
रायगडावर असलेले वाघ्या कुत्र्याचे शिल्प हटवण्याची मागणी छत्रपती संभाजी राजे यांनी केली होती. मात्र, या मागणीला संभाजी भिडे यांनी विरोध केला आहे. रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यात येऊ नये, असंही संभाजी भिडे म्हणाले आहेत.