। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
पुरूषांच्या 23 वर्षांखालील राज्य स्पर्धेत 21 वर्षीय समीर रिझवी याने वेगवान द्विशतकाचा विक्रम नोंदवला आहे. उत्तर प्रदेशच्या कर्णधाराने वडोदराच्या मैदानावर त्रिपुराच्या गोलंदाजांनी धुलाई करताना 97 चेंडूंत 201 धावांची नाबाद खेळी केली. त्याने या खेळीत 20 षटकार व 13 चौकारांचा पाऊस पाडला. या फॉरमॅटमधील हे सर्वात वेगवान द्विशतक ठरले. 23 वर्षांखालील ही स्पर्धा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मोडली जात नाही.
या स्पर्धेत उत्तर प्रदेशने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 4 बाद 405 धावा उभ्या केल्या. शोएब सिद्धीकी (38) व शौर्य सिंग (51) यांच्या दमदार सुरुवातीनंतर आदर्श सिंगने 52 धावांची खेळी केली. त्यानंतर समीरने तुफान फटकेबाजी केली. समीरने 97 चेंडूंत 13 चौकार व 20 षटकारांनी 207.22च्या स्ट्राईक रेटने 201 धावा चोपल्या.
दरम्यान, आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये समीरला दिल्ली कॅपिटल्सने 95 लाखांत आपल्या संघात दाखल करून घेतले. यापूर्वीच्या पर्वात त्याच्यासाठी चेन्नई सुपर किंग्सने 8.4 कोटी रुपये मोजले होते. आयपीएलच्या पदार्पणाच्या पर्वात त्याला 5 सामन्यांत 51 धावाच करता आल्या. चेन्नई सुपर किंग्स त्याला 4 कोटींत अनकॅप्ड म्हणून कायम राखू शकले असले, परंतु त्याने त्याला रिलीज केले होते.