सामवेदा लॉजिस्टीक गोदाम आगीत खाक

| उरण | वार्ताहर |

विंधणे ग्रामपंचायत हद्दीतील सामवेदा लॉजिस्टीक या मालाची हाताळणी करणाऱ्या गोदामाला सोमवारी (दि.8) दुपारी 2.30 च्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीची तीव्रता एवढी भयंकर होती की संपूर्ण गोदाम जळून खाक झाले आहे. सिडकोच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

उरण तालुक्यात मालाची हाताळणी करणाऱ्या अनधिकृत गोदामाचा गोरखधंदा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तसेच, वारंवार गोदामाला आग लागल्याच्या घटना या घडत आहेत. त्यात विंधणे ग्रामपंचायत हद्दीतील चिरनेर-गव्हाण फाटा या रस्त्यावरील कंठवली बस स्थानकाजवळ उभारण्यात आलेल्या सामवेदा लॉजिस्टीक या मालाची हाताळणी करणाऱ्या गोदामाला सोमवारी दुपारच्या सुमारास आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली. या गोदामात स्टेशनरी, खेळण्यांसह इतर माल होता. या आगीची तीव्रता एवढ्या प्रमाणात होती की धुराचे लोट उंच उंच आकाशाला भिडले होते. या आगीची माहिती मिळताच सिडकोच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

या आगीत मोठ्या प्रमाणात माल जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र, या गोदामात अग्निशमन यंत्रणा नसल्याचे समजत असल्याने या माल हाताळणी करणाऱ्या गोदामाला परवानगी कोणी दिली, अशी चर्चा जनमानसात सुरू आहे.

Exit mobile version