| उरण | वार्ताहर |
उरण द्रोणागिरी नोड येथील सी डब्ल्यु सी उर्फ बजेट या मालाची हाताळणी करणाऱ्या गोदामाला मंगळवारी (दि.13) रात्री 10.30 च्या सुमारास आग लागण्याची घटना घडली. ही आग गोदाम व्यवस्थापकाच्या हलगर्जीपणामुळे लागल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. अग्निशमक दलाच्या जवानांच्या चित्तथरारक कसरतीमुळे आग तात्काळ आटोक्यात आण्यात आली.
उरण तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात मालाची हाताळणी करणारे गोदाम आहेत. उरण द्रोणागिरी नोड येथील सी डब्ल्यु सी उर्फ बजेट या पागोटे ग्रामपंचायत हद्दीतील मालाची हाताळणी करणाऱ्या गोदामाला मंगळवारी रात्रीच्या सुमारास आग लागण्याची घटना घडली. ही आग गोदामात सुरु असणाऱ्या वेल्डिंगच्या कामातून लागली असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. या आगीची माहिती सिडको, जेएनपीए बंदरातील अग्निशमन दलाच्या जवानांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग तात्काळ विझविली. मात्र, गोदामात काम करणाऱ्या कामगारांच्या सतर्कतेमुळे कामगारांचे जीव थोडक्यात बचावले आहेत. हजार ड्रॅग समतेच ज्वलनशील रासायनिक असणाऱ्या ठिकाणांवर आग पसरली असती तर पागोटे गावातील रहिवाशांना त्यांच्या झळा बसल्या असत्या अशी भिती पागोटे गावातील रहिवाशी व्यक्त करत आहेत. तरी उरण तहसील, पोलीस यंत्रणा तसेच संबंधित खात्याचे अधिकारी वर्गाने उरणच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून ठोस उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी रहिवासी व्यक्त करत आहेत.