संशयाच्या वादातून हत्या केल्याचा अंदाज; सुधागड परळी येथील नर्सिंग होम दवाखान्यात घडली घटना
| पाली/बेणसे | धम्मशील सावंत |
रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुका निघृण खुनाच्या घटनेने अक्षरशः हादरून गेला. सुधागडच्या परळीत मोठी खळबळ उडवणारी घटना घडली. प्रेम प्रकरणाच्या वादातून प्रियकराने प्रेयसीवर कोयत्याने वार करून क्रूर हत्या करुन गळफास घेऊन स्वतःला संपवले. सुधागड तालुक्यातील परळी येथील राजेंद्र पॉलीक्लिनिक नर्सिंग होम दवाखाना येथे ही घटना घडली आहे. नर्सिंग होम दवाखान्यात तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसून आली, तर दुसऱ्या बाजूला गळफास घेतलेल्या अवस्थेत प्रियकर तरुणही आढळून आल्याची भयंकर धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेम प्रकरणातील वादातून दोन जीवांचा करून अंत झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेने रायगड जिल्हा हादरला असून सर्वत्र खळबळ उडाली आहे. प्रेम प्रकरणाच्या वादातून शेखर संतोष दुधाणे (रा. दुधाणेवाडी, ता. सुधागड, वय 26) याने परळी येथील राजेंद्र पॉलीक्लिनिक नर्सिंग होम दवाखाना येथे जावून नर्स म्हणून काम करणाऱ्या पोर्णिमा अनंत देसाई, (रा. देसाईपाडा, ता. सुधागड, वय 22) हिची हत्या करुन तेथेच गळफास घेऊन स्वतःला संपवले आहे. पौर्णिमा देसाई हिच्यासोबत त्याचे प्रेमसंबंध होते. ती टाळाटाळ करीत असल्याने त्याचा संशय बळावल्याने तोच राग मनात धरून त्याने नर्सिंग होममध्ये जाऊन तिची भेट घेतली व तिच्यावर कोयत्याने दोन्ही मनगटावर व गळ्यावर गंभीर दुखापती करून तिला जीवे ठार मारले. त्यानंतर त्याने त्याच खोलीत स्वतः बेडशीटच्या सहाय्याने गळफास घेऊन स्वतःचे जीवन संपविले.
ही घटना समजताच जांभूळपाडा, पाली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. पुढील तपास पाली पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस उपनिरीक्षक सचिन निकम यांच्या माध्यमातून तपास सुरू आहे. यावेळी दवाखान्याबाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे पाली खोपोली राज्य महामार्गांवर परळी बाजारपेठ येथे मोठी कोंडी झाली होती. स्थानिक, नागरिक व पोलिसांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले. वाहतूक सुरळीत करण्यात आली. मात्र या घटनेने परळी सुधागड पूर्णतः हादरून गेला.