वाळू उत्खनन सर्रासपणे सुरुच: कारवाईकडे मात्र कानाडोळा

| पेण | संतोष पाटील |

रायगडात सक्शन पंपाद्वारे वाळू उत्खनन करणार्‍यांचे प्रमाण वाढले असून, या वाळू उपशांविरोधात प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याने सर्वसामान्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. वारंवार होणार्‍या तक्रारीची दखल घेत अतिरिक्त जिल्हाधिकारी अमोल यादव यांनी प्रशासनाने दोनच दिवसांपूर्वी सक्शन पंपाद्वारे रेती उत्खनन करणार्‍यांविरोधात कारवाई केलेली आहे. तरीही अजूनही जर कुणी उपसा करत असेल तर त्यांच्यावर तातडीने कारवाई केली जाईल,असे आश्‍वासन दिलेले आहे.

सध्या रायगड जिल्हयात सक्शन पंपाव्दारे जोरदार वाळू उत्खननाचा अवैध धंदा सुरू आहे. महाडपासून ते उरणपर्यंत वाळू माफियांनी हैदोस घातला असून शासनाच्या नियमांची पायमळणी करत आहेत. मात्र पेण तालुक्यातुन महसूल खात्याने वाळू माफियांना हद्दपार केले आहे. असे असताना धरमतरच्या खाडीत अलिबाग,रोह्याच्या हद्दित मोठया प्रमाणात वाळू उत्खनन सुरू आहे. राजरोसपणे धरमतरच्या खाडीपासून पाताळगंगेच्या खाडीपर्यंत अहोरात्र सक्शन पंप सुरू आहेत. मात्र त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे उघडपणे दिसत आहे. यंत्रणेला धरमतर पुलाशेजारील, खारपाडा पुलाशेजारील, सावित्री नदीवरील, दासगावा जवळील, आंबेत जवळील, सानेगावाच्या खाडीच्या हद्दीतील केळवणे, वशेणी पुलाजवळील सक्शन पंप दिसत नाहीत.

एकीकडे पर्यावरण खाते पर्यावरणाचा र्‍हास होवू नये म्हणून वाळू उत्खननाला बंदी घालते. तर दुसरीकडे राजकिय मंडळींचे वरदहस्त असलेली बडया बापाची पोरे-टोरे बिनधास्तपणे सरकारी नियमांची पायमळणी करून अवैधरित्या वाळू उत्खनन करून लाखोंनी सरकारी महसूल बुडवत आहेत. सीआरझेड कायदयाचा उल्लंघन करून हजारो मॅग्रोज वृक्षांची (कांदळवन) तोडदेखील करत आहेत. जर वेळेत या अवैध वाळू उत्खननाला खिळ घातली नाही तर भविष्यात याचा तोटा बळीराजाला झाल्याशिवाय राहणार नाही,असे बोलले जाते.

धरमतरच्या खाडीत अलिबाग तालुक्याच्या हद्दीत काहीजणांकडून सक्शन पंपाद्वारे शेकडो ट्रक वाळू उपसा करीत असताना या परिसरातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी महसूल खात्याच्या अधिकार्‍यांना प्रत्यक्ष भेटून, मोबाईलवरून व्हॉट्सअप, व्टिटर व्दारे कळविले आहे. परंतु, महसूल विभागाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचे दिसत आहे.अशी तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.

धरमतर खाडीत अलिबाग तालुक्याच्या हद्दीत मोठया प्रमाणात सक्शन पंपाद्वारे वाळू उत्खनन चालू असल्याने धरमतरखाडीचे बाहयकाटे (किनारा) कमकुवत झाले आहेत. उधाणाच्या भरतीच्या वेळी अनेक ठिकाणी बाहयकाटे फुटून बहिरीचा पाडा, गणेशपट्टीी या गावांना पाणी शिरत आहे, या भागातदेखील वाळू उत्खननाने बाहय काटे कमकुवत होवून भविष्यात मोठया खांडी जावून समुद्राचे पाणी शेतीत शिरून शेती नापीक होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

तर सक्शन पंप लावून केलेल्या वाळू उत्खननामुळे सागरी जीवांच्या संवर्धन आणि सुरक्षेसाठी निसर्गाने उभारलेली कांदळवने ही नष्ट होऊन सागरी जिवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. तरी जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी वाळू माफियांवर कारवाई करावी,अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान,या संदर्भात अतिरिक्त जिल्हाधिकारी अमोल यादव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत अलिबाग प्रांतांसमवेत चर्चा करण्याचे सुचित केले.त्यानुसार प्रस्तूत प्रतिनिधीने प्रांत प्रशांत ढगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

पेण तालुक्यात प्रशासनाची कारवाई
पेण तालुक्यात महसूल खाते आणि पोलिस खाते यांनी परस्परांच्या हातात हात घालून वाळू माफियांना वेसन घालण्यात यश संपादन केले आहे. परंतु हे वाळू माफिये अलिबाग हद्दीमध्ये बिध्दास्तपणे कुणाला न घाबरता वाळू उत्खनन करत आहेत. महसूल अधिकार्‍यांमध्ये प्रांत अधिकारी विठ्ठल इनामदार, तहसिलदार स्वप्नालि डोईफोडे, नायब तहसिलदार प्रसाद कालेकर, नितीन परदेशी व पोलिस ठाणे वडखळ, पोलीस ठाणे दादर, पोलीस ठाणे पेण या मंडळीने पेण तालुक्यातून वाळू माफियांना हद्दपार करण्यामध्ये मोलाची भूमीका बजावली आहे. त्यामुळे त्यांचे सर्व स्थरातून अभिनंदन केले जात आहे.

दोनच दिवसांपूर्वी सक्शन पंपावरुध्द कारवाई केली. पंप जाळून टाकले तरी देखील उत्खनन करत असतील तर येत्या दोन दिवसात पुन्हा धडक कारवाई करून सेक्शन पंप जप्त करून पाण्यात बुडविले जातील.

अमोल यादव, अतिरिक्त जिल्हाधिकारी
Exit mobile version