जांभुळपाडा येथे अज्ञात व्यक्तीकडून मोठ्या प्रमाणात उत्खनन
| सुधागड-पाली | प्रतिनिधी |
जांभुळपाडा येथे अंबा नदी पात्रामध्ये अज्ञात व्यक्तीने मोठ्या प्रमाणात रेजगा उत्खनन करून चोरी केली आहे. या अनधिकृत उत्खननामुळे नदी पात्रामध्ये मोठा खड्डा पडला असून नदीची धूप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली असून महसूल प्रशासनाने तातडीने याची दखल घेऊन दोषींविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, महसूल प्रशासन, पोलीस विभाग आणि पर्यावरण नियंत्रण मंडळ यांनी संयुक्तपणे तपास करून दोषींना शिक्षा करावी. नदी पात्राचे संरक्षण करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने कठोर नजर ठेवावी, तसेच भविष्यात अशा प्रकारच्या अनधिकृत उत्खननाला आळा घालण्यासाठी नियमित तपासणी व गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.
अंबा नदीतील रेजगा चोरी हा केवळ स्थानिक गुन्हा नसून पर्यावरणीय हानीस कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे शासनाने तातडीने कारवाई करून दोषींना शिक्षा करणे आवश्यक आहे. नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करून नदीचे संरक्षण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.







