रक्तदानाचा शतकवीर! संदेश बेडेकर यांचा प्रेरणादायी प्रवास

बागमळा येथे 100वे रक्तदान पूर्ण; कुटुंबासह समाजसेवेचा आदर्श

| चौल | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील 63 वर्षीय संदेश वसंत बेडेकर यांनी बागमळा येथे आयोजित रक्तदान शिबिरात शंभरावे रक्तदान करत एक प्रेरणादायी टप्पा गाठला आहे. आझाद मित्रमंडळाच्या 17 व्या रक्तदान शिबिरात त्यांनी ही उल्लेखनीय कामगिरी पूर्ण करत समाजासमोर आदर्श निर्माण केला.

वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी रक्तदानास सुरुवात केलेल्या बेडेकर यांनी गेल्या अनेक दशकांत सातत्याने रक्तदान करत ‘सर्वश्रेष्ठ दान’ जपले आहे. त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, नव्या पिढीने त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन आझाद मित्रमंडळाचे अध्यक्ष सुचिन सुधाकर घरत आणि उपाध्यक्ष राजेंद्र रामचंद्र घरत यांनी केले.

हिंदू नववर्षाच्या निमित्ताने दरवर्षी बागमळा येथे आयोजित होणाऱ्या रक्तदान शिबिराला यंदा 17 वर्षे पूर्ण झाली. समाजोपयोगी उपक्रमांची परंपरा जपणाऱ्या मंडळाच्या या उपक्रमाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यंदाच्या शिबिराचे मुख्य आकर्षण ठरले ते संदेश बेडेकर यांचे शंभरावे रक्तदान. यावेळी मंडळातर्फे त्यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्या मुलगी सुरुची बेडेकर हिनेही आतापर्यंत 9 वेळा रक्तदान करत कुटुंबाची परंपरा पुढे चालवली आहे. संपूर्ण कुटुंब समाजसेवेसाठी समर्पित असल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला.

अलिबाग तालुक्यात शंभर वेळा रक्तदान करणारे बेडेकर हे एकमेव असल्याचा गौरव मंडळाने केला. त्यांच्या कार्यातून तरुणांनी प्रेरणा घेऊन रक्तदानास पुढे यावे, असेही आवाहन करण्यात आले.

दरम्यान, बेडेकर यांचा जीवनप्रवासही तितकाच प्रेरणादायी आहे. सुरुवातीच्या काळात त्यांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालवली, तर सध्या ते टेलरिंग व्यवसाय करत आहेत. रिक्षा चालवत असताना त्यांनी कधीही गरजूंची अडवणूक न करता, मिळेल त्या भाड्यात समाधान मानत सेवा दिल्याचे ते सांगतात.
समाजासाठी नि:स्वार्थ भावनेने कार्य करणारे संदेश बेडेकर हे आज खऱ्या अर्थाने ‘रक्तदानाचे शतकवीर’ ठरले आहेत.

1985 साली प्रथम रक्तदान केल्याची आठवण त्यांनी सांगितली. त्यांच्या या सेवाभावी प्रवासात पत्नी मेघा बेडेकर यांची मोलाची साथ लाभली असून, त्यांनीही 32 वेळा रक्तदान केले आहे.

Exit mobile version