| पनवेल | प्रतिनिधी |
शालेय नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत पनवेल तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या सांगुर्ली शाळेची यशोगाथा राष्ट्रीय स्तरावरील संकेतस्थळावर प्रकाशित झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्काराच्या मानकरी आणि शाळेच्या मुख्याध्यापिका मानसी मिलिंद भोसले यांनी लिहिलेल्या या यशोगाथेत ग्रामीण भागातील शाळेचा शैक्षणिक परिवर्तनाचा प्रेरणादायी प्रवास उलगडण्यात आला आहे.
शालेय नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत सन 2025-26 मध्ये ‘सामग्री व मजकूर निर्मिती’ या उपक्रमाद्वारे महाराष्ट्रातील निवडक 100 शाळांच्या प्रेरणादायी यशोगाथांची निवड करण्यात आली. शालेय शिक्षण अधिकाऱ्यांच्या माध्यमातून संकलित करण्यात आलेल्या या यशोगाथा राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था आणि राष्ट्रीय शालेय नेतृत्व केंद्र, नवी दिल्लीच्या राष्ट्रीय संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आल्या आहेत. या उपक्रमामध्ये पनवेल तालुक्यातील सांगुर्ली जिल्हा परिषद शाळेच्या यशोगाथेलाही स्थान मिळाले आहे. ‘हुशार व प्रतिभावान विद्यार्थ्यांना विशेष शिक्षण देणाऱ्या शाळेची यशोगाथा’ या शीर्षकाखाली ही यशोगाथा प्रकाशित करण्यात आली आहे. या यशोगाथेत शाळेचा विकास व परिवर्तन, आदर्श शाळा निर्मिती, नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थ्यांच्या प्रवेशात झालेली वाढ, पालकांचा सहभाग, स्थानिक समुदायाचा सहभाग तसेच विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांवर विशेष प्रकाश टाकण्यात आला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुख्याध्यापिका मानसी भोसले तसेच सहभागी मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षीय अधिकाऱ्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.
सांगुर्ली शाळेची यशोगाथा राष्ट्रीय संकेतस्थळावर
