वरसोली समुद्र किनार्‍यावर स्वच्छता अभियान

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
संपूर्ण देशभर आजादी का अमृत महोत्सव साजरा केला जात आहे व या अंतर्गत विविध कार्यक्रम सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरू युवा केंद्र रायगड-अलिबाग व प्रिझम सामाजिक विकास संस्था, स्वयंसिद्धा सामाजिक विकास संस्था रोहा, स्पर्धा विश्‍व अकॅडमी अलिबाग यांच्या सहाय्याने वरसोली समुद्रकिनार्‍यावर स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. याकरिता स्पर्धा विश्‍व अकॅडमीचे युवक युवती प्रिझम संस्थेचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक निशांत रौतेला यांनी सांगितले की, अभ्यासाबरोबर आपण विविध सामाजिक उपक्रमामध्ये सहभाग घेतो याचा आपल्याला फायदाच होतो. स्पर्धा विश्‍व अकॅडेमीच्या माध्यमातून उत्कृष्ट भावी अधिकारी घडत आहेत ही एक गौरवाची बाब आहे. यावेळी प्रिझम संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी गोंधळी यांनी संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमांची माहिती उपस्थित वर्गाला दिली. या स्वच्छता अभियानात साधारणतः 100 विद्यार्थ्यांनी वरसोली समुद्र किनारा स्वच्छ केला. यावेळी इंडियन आर्मी सोल्जर मयुरेश गावंड, निसर्गप्रेमी तथा सामाजिक कार्यकर्त्या बेला दलाल, स्वयंसिद्धा संस्थेच्या अध्यक्षा तथा स्पर्धा विश्‍व अकॅडमीच्या संचालिका सुचिता साळवी, तालुका क्रीडा अधिकारी अंकिता मयेकर, क्रीडा अधिकारी सचिन निकम, कुस्ती कोच संदिप वांजळे, सिमाली नाईक, बार्टीच्या समतादूत अनुजा पाटील, ग्रामपंचायत वरसोलीचे कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version