अलिबाग नगरपरिषदेचा अनोखा उपक्रम
| अलिबाग | प्रतिनिधी |
“आपले शहर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी स्वच्छता कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत असतात. त्यांच्या कार्याचा सन्मान करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आधुनिक यंत्रसामग्रीच्या वापरातून त्यांना सुरक्षित आणि सन्मान्य कार्यपरिसर उपलब्ध करून देणे, हीच नमस्ते डेची खरी भावना आहे,” असे प्रतिपादन उपनगराध्यक्ष ॲड. मानसी म्हात्रे यांनी केले.
भारत सरकारच्या नॅशनल ॲक्शन फॉर मेकनाइज्ड सॅनिटेशन इकोसिस्टिम (नमस्ते) या उपक्रमांतर्गत दि.14 जुलै रोजी देशभर नमस्ते डे साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधत अलिबाग नगरपरिषदेतर्फे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी सभागृहात विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष ॲड. मानसी म्हात्रे यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत नागरिकांना स्वच्छता, सुरक्षितता आणि मानवी सन्मानाचा संदेश दिला. तसेच, नमस्ते डेचा उद्देश स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान करणे, त्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेला प्राधान्य देणे, धोकादायक हाताने स्वच्छता पूर्णपणे बंद करून यांत्रिक स्वच्छता व्यवस्थेला प्रोत्साहन देणे हा आहे. या माध्यमातून स्वच्छता कर्मचाऱ्यांना सुरक्षित साधने, आधुनिक यंत्रसामग्री, प्रशिक्षण आणि सन्मानजनक कार्यपरिसर उपलब्ध करून देण्याचा संदेश देण्यात येतो.
या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या निस्वार्थ सेवेला सलाम करत शहराच्या स्वच्छतेमागे त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे नमूद केले. स्वच्छता ही केवळ नगरपरिषदेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाने ती स्वतःची सामाजिक जबाबदारी समजून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा अक्षया नाईक व उपनगराध्यक्ष ॲड. मानसी म्हात्रे यांच्या हस्ते अलिबाग नगरपरिषदेतील स्वच्छता कर्मचारी तसेच शहरातील स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या विविध व्यक्ती, संस्था आणि सहकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला नगराध्यक्षा अक्षया नाईक, उपनगराध्यक्ष ॲड. मानसी म्हात्रे, नगरसेविका संध्या पालवणकर, ॲड. नीलम हजारे, नगरसेवक ॲड. ऋषिकेश माळी, जमालुद्दीन सय्यद, संदीप पालकर, इन्फिनिटी पब्लिक रिलेशन पनवेलचे अयुफ अकुला, के.एल.ई. महाविद्यालय पनवेलचे प्रतिनिधी, अलिबाग नगर परिषद उर्दू शाळेचे प्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी प्रियांका वाघ, नगर अभियंता संतोष मुंढे, स्वच्छता अभियंता प्रियांका मोरे, स्वच्छता निरीक्षक धनंजय आंब्रे, शहर समन्वयक आर्या जाधव, प्रकाश तांबे तसेच अलिबाग नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान म्हणजे त्यांच्या श्रमांचा आणि समाजासाठीच्या योगदानाचा गौरव होय. त्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अलिबाग नगरपरिषद कटिबद्ध आहे.
– अक्षया नाईक, नगराध्यक्षा, अलिबाग नगरपरिषद
