शौचालय घोटाळा आरोप प्रकरणी संजय राऊत यांची निर्दोष मुक्तता

। मुंबई । प्रतिनिधी ।

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शौचालय घोटाळा आरोप प्रकरणातून त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. शौचालय घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांनी बरेच आरोप केले होते. या विरोधात किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या यांनी तक्रार केली होती. या प्रकरणी अनेक दिवसांपासून सुनावणी रखडलेली होती. अखेर आज सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली त्यात संजय राऊत यांना निर्दोष मुक्त करण्यात आले.

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरूद्ध माजगाव न्यायालयात मानहानीचा गुन्हा दाखल केला गेला होता. त्या न्यायालयाच्या निकालाविरूद्ध संजय राऊत यांनी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या प्रकरणी आज सुनावणी पार पडली. त्यात संजय राऊत यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर शौचालय घोटाळ्याचे आरोप केले होते. या आरोपांनंतर मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरूद्ध मानहानीचा दावा दाखल केला होता. या प्रकरणी माजगाव कोर्टात सुनावणी होऊन संजय राऊत यांना दोषी ठरवण्यात आलं होतं. त्यानंतर न्यायालयानं संजय राऊत यांना १५ दिवसाची तुरूंगवासाची शिक्षा सुनावली होती. त्याचबरोबर संजय राऊत यांना दंड देखील ठोठावण्यात आला होता. या निकालाविरूद्ध संजय राऊत यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी सत्र न्यायालयानं संजय राऊत यांच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. आज झालेल्या सुनावणीत न्यायालयानं संजय राऊत यांची निर्दोष मुक्तता केली आहे.

Exit mobile version