संजय राऊत यांची टीका
। नाशिक । प्रतिनिधी ।
भविष्यामध्ये मुस्लिमांच्या या सगळ्या संपत्त्या भाजपच्या संबंधित उद्योगपतींच्या किंवा त्यांच्या नेत्यांच्याच घशात जातील, असे विधान शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खा. संजय राऊत यांनी केले आहे. तसेच, हिंदुत्वाचे नाव घ्यायचे आणि देश विकायचा, सारे गिळायचे, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.
नाशिकमध्ये बोलताना संजय राऊत म्हणाले की, वक्फ बोर्डाच्या इमारतीवरती उद्योगपतींची अलिशान घर उभी आहेत. ती कायदेशीर करण्यासाठी बिल आणले आहेत. हे मोठे उद्योगपती कोण तुम्हाला माहिती आहे. 2014 पासून 2024 पर्यंत मोदींच सरकार आहे. 2014 ते 2024 या काळामध्ये या सरकारला गरीब मुसलमान वक्फ बोर्डातला घोटाळा दिसला नाही. 2014 ते 2024 पर्यंत देशातली सगळी संपत्ती विकून झाली, सार्वजनिक संपत्ती विकून झाली. उद्योगपतींच्या असे लक्षात आले की आता विकायला काही उरले नाही. मग यांचे लक्ष या वक्फ बोर्डाच्या संपत्तीकडे गेले, आता हे विकले पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी हे विधेयक आणले आहे. सगळा देश विकून झाल्यावरती त्यांना वक्फ बोर्डाची 2 लाख कोटी रुपयांची संपत्ती दिसली. ही संपत्ती आपल्याच माणसांना मिळायला पाहिजे आणि मग त्यांनी हे वक्फ बोर्डाचे विधेयक सुधारणा विधायकच्या नावाखाली आणले. या संपत्तीचा गोर गरिबांना काय फायदा होणार आहे? भविष्यामध्ये मुस्लिमांच्या या सगळ्या संपत्त्या भारतीय जनता पक्षाच्या संबंधित उद्योगपतींच्या किंवा त्यांच्या नेत्यांच्याच घशात जाणार आहेत हे सत्य आहे. पण हिंदुत्वाच नाव द्यायचे आणि गिळायचे, बाकी काही नाही, असे संजय राऊत म्हणाले.