। मुंबई । प्रतिनिधी ।
संपूर्ण महाराष्ट्रात शिवजयंती मोठ्या उत्साहाने आणि जल्लोशात साजरी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पायाभरणी केली जाणार आहे. तसेच, मंत्री नितेश राणे मोठी मिरवणूक काढणार आहेत. यावर महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीत भ्रष्टाचार करणारे आज मिरवणुका काढतायत, असे म्हणत शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.
संजय राऊत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक ही प्रत्येक ठिकाणी निघायलाच पाहिजे. अमेरिकेतसुद्धा निघते. कॅनडात निघते, इंग्लंडमध्ये निघते. त्यासाठी कोणी इथून जायची गरज नसते. लोक उस्फुर्तपणे मिरवणुका काढतात. परंतु, ज्या पद्धतीने पुतळ्यात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला. आणि तो भ्रष्टाचार करणारे हेच लोकं होते. ते आज मिरवणुका काढतात. हेच सरकार होते. यांच्या काळात भ्रष्टाचार झाला. आणि छत्रपती शिवरायांचा पुतळा एका क्षणात कोसळून खाली पडला. तसेच, महाराष्ट्राचे मन त्या दिवशी दु:खी झाले, त्या दु:खात महाराष्ट्र अखंड राहिला. आणि आज परत तुम्ही नव्याने पुतळा करत आहात. मात्र, जे झाले त्याची जबाबदारी कोणी घेतली नाही, असेही राऊत म्हणाले.