महायुती-महाविकास आघाडीला प्रत्येकी 10 जागा; संजयकाका पाटील ठरणार किंगमेकर
| सांगली | प्रतिनिधी |
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत कोणत्याही आघाडीला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. 21 सदस्यीय संचालक मंडळात महायुती आणि महाविकास आघाडीला प्रत्येकी 10 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे बहुमतासाठी आवश्यक असलेला 11 चा आकडा गाठण्यासाठी अपक्ष विजयी झालेले माजी खासदार संजयकाका पाटील यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
महाविकास आघाडीत काँग्रेसला सहा, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)ला चार जागा मिळाल्या आहेत. महायुतीमध्ये भाजपला पाच, शिवसेना (शिंदे गट)ला तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ला दोन जागा मिळाल्या आहेत. तासगाव विकास सेवा सोसायटी गटातून माजी आमदार सुमनताई पाटील यांचा अवघ्या दोन मतांनी पराभव करून संजयकाका पाटील विजयी झाले आहेत. त्यामुळे ते आता किंगमेकरच्या भूमिकेत आले आहेत. महायुती की महाविकास आघाडी, संजयकाका कोणाला पाठिंबा देणार आणि जिल्हा बँकेचे अध्यक्षपद कोणाकडे जाणार, याकडे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
