संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान

रायगडात होणार स्वच्छतेचा जागर
सर्वोत्तम कामगिरी करणार्‍या ग्रामपंचायती, अधिकारी व कर्मचार्‍यांचा सन्मान

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
नागरिकांनी स्वच्छतेच्या सवयी अंगीकारून ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्यमान, जीवनस्तर उंचावण्यासाठी ग्रामस्थांच्या सक्रिय व सातत्यपूर्ण सहभागातून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान पुन्हा अधिक जोमाने राबविण्यात येणार आहे. यामध्ये विशेष कामगिरी करणार्‍या ग्रामपंचायती, जिल्हा ते ग्रामपंचायत स्तरावरील अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान केला जाणार आहे. राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने नुकतेच संत गाडगे ग्राम स्वच्छता अभियानाबाबत शासन निर्णयाद्वारे मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार सदरच्या अभियानाला दि. 11 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली असून, 15 नोव्हेंबरपर्यंत सदर अभियान जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात येणार आहे.

संपूर्ण ग्रामीण भागातील स्वच्छतेत सातत्य टिकण्याच्या अनुषंगाने स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत ग्रामीण भागातील वैयक्तिक शौचालय बांधकाम, सार्वजनिक शौचालय संकुलाचे बांधकाम, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, गोबरधन, मैला गाळ व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन अशा प्रकारच्या सर्व कामामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणार्‍या ग्रामपंचायती व ग्रामसेवक, गट विकास अधिकारी यांना अभियानांतर्गत वेगवेगळ्या स्तरावर पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा अंतर्गत पुरस्कार ः प्रत्येक जिल्हा परिषद गटातील- प्रथम क्रमांक ग्रा.पं.ला रु.60 हजार, जिल्हा स्तरावरील- प्रथम ग्रा.पं.रु 6 लाख, व्दितीय रु.4 लाख व तृतीय 3 लाख, विभागस्तरीय- प्रथम ग्रा.पं.ला 12 लाख, द्वितीय 9 लाख व तृतीय 7 लाख व राज्यस्तरीय- प्रथम ग्रा.पं ला 50 लाख, व्दितीय 35 लाख व तृतीय 30 लाख. याशिवाय जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक वर आलेल्या ग्रामपंचायती वगळून खालील प्रमाणे विशेष पुरस्कार देण्यात येणार आहेत. स्व.वसंतराव नाईक पुरस्कार – घनकचरा,सांडपाणी व मैला गाळ व्यवस्थापन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार – पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन, स्व. आबासाहेब खेडकर पुरस्कार- शौचालय व्यवस्थापन या घटकामध्ये पुरस्कार रोख बक्षीस स्वरुपात देण्यात येणार आहेत. तसेच ग्रामसेवक ते जिल्हास्तरीय अधिकारी यांचाही सन्मान होणार आहे, अशी माहिती पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले यांनी दिली.

स्वच्छतेच्या कार्यक्रमातील आपलेपणा व महत्त्व पटवून देण्याकरिता जिल्ह्यात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. गावात शाश्‍वत स्वच्छतेच्या या महायज्ञात सर्व ग्रामपंचायती, नागरिक, गाव व तालुकास्तरीय कर्मचारी व अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी सक्रीय सहभाग घ्यावा.

– डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.
Exit mobile version