संत नामदेव माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नांदगाव जिल्ह्यात प्रथम


| पाली/गोमाशी | वार्ताहर |

सुधागड तालुक्यातील संत नामदेव माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नांदगाव या विद्यालयास ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियानात माध्यमिक विभागात जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे.

राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्यावतीने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान दि.01 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2024 या कालावधीत राबविण्यात आले आहे. या अभियानात जिल्ह्यातील सर्व खासगी अनुदानित शाळांनी सहभाग घेतला होता. रायगड जिल्ह्यातील शाळांची तपासणी जिल्हास्तरीय मूल्यमापन समितीने प्रत्येक उपक्रम निहाय मूल्यमापन करून मूल्यांकन केले. त्यानुसार नांदगाव विद्यालयास जिल्हा स्तरावरील प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे. शाळा सर्व शैक्षणिक व भौतिक सुविधा पूर्ण करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष सुरेश खैरे, शाळा समिती अध्यक्ष जगदीश सुतार, सेवाभावी संस्था, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पालक आणि माजी विद्यार्थी यांचे मोलाचे योगदान लाभले. तसेच, शाळेचे प्राचार्य संभाजी ढोपे, शिक्षक वृंद , शिक्षकेत्तर कर्मचारी आणि शाळेतील सर्व विद्यार्थी यांनी खूप मेहनत घेऊन यशस्वी झाल्याने पंचक्रोशीतील पालक वर्ग आणि माजी विद्यार्थ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


नांदगाव विद्यालयाने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात सहभागी होऊन जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला याचे संस्थेचा अध्यक्ष म्हणून मला खुप आनंद होत आहे. या अभियानात प्रथम क्रमांक येण्यासाठी माझ्या शाळेतील प्राचार्य सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी पंचक्रोशीतील पालकवर्ग, माजी विद्यार्थी यांनी खूप मेहनत घेऊन यशस्वी झाले हे अभिमानास्पद आहे. या सर्वाना मी मनापासून धन्यवाद देतो.

सुरेश खैरे
अध्यक्ष भोराई शिक्षण प्रसारक मंडळ नांदगाव
Exit mobile version