| पाली/गोमाशी । वार्ताहर ।
रायगड जिल्हा क्रीडा परिषद अलिबाग यांच्यावतीने 2022-23 या शैक्षणिक वर्षात तालुका स्तरीय क्रीडास्पर्धा सुरू झाल्या आहेत. सुधागड तालुक्यातील खो-खो स्पर्धा ता. 18 व 19 नोव्हेंबर रोजी संत नामदेव माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नांदगाव सुधागड येथे सपन्न झाली. या स्पर्धेचे उद्घाटन पाली नगरपंचायत नगरसेवक सुमेध सुरेश खैरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे सुधागड तहसीलदार उत्तमराव कुंभार, गटविकास अधिकारी अशोक महामुनी, गटशिक्षणाधिकारी साधुराम बांगारे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जगदीश सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.
तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत नांदगाव विद्यालयातील 14 वर्ष वयोगटातील मुले आणि मुली यांनी प्रथम क्रमांक पटकावला तसेच 17 वर्ष वयोगट मुले आणि मुलींनी देखील प्रथम क्रमांकाला गवसणी घालून नांदगाव विद्यालयाचे नाव तालुक्यात अव्वल ठेवले. तसेच 19 वर्ष मुले व मुली वयोगटात ग. बा. वडेर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाली यांनी प्रथम पारितोषिक कमाई केली. सर्व विद्यार्थी आणि शिक्षक मार्गदर्शक यांचे संस्थेचे अध्यक्ष सुरेश खैरे यांनी कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.