मालिकेत आघाडी, सूर्यकुमारचे विक्रमी शतक
| माउंट माऊनगानुई । वृत्तसंस्था ।
सूर्यकुमार यादवने धडाकेबाज शतकासह भारताने विजयाचा पाया रचला होता. त्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी अचूक गोलंदाजी करत त्यावर कळस चढवला. त्यामुळेच भारताला न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवता आला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवता आली. सूर्यकुमारने अवघ्या 51 चेंडूंत 111 धावा फटकावल्या. सूर्यकुमारच्या या वादळी खेळीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडसमोर 192 धावांचं आव्हान ठेवता आले. त्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी दमदार मारा केला आणि भारताला 65 धावांनी विजय मिळवून दिला.
भारताच्या 192 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या डावाचची सुरुवात चांगली झाली नाही. कारण भारताचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने न्यूझीलंडला पहिल्याच षटकात धक्का दिला. त्यानंतर डेवॉन कॉनवे आणि केन विल्यम्सन यांनी काही काळ संघाचाडाव सारवण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्यानंतर कॉनवे 25 धावांवर बाद झाला आणि त्यानंतर न्यूझीलंडच्या डावाला उतरती कळा लागली. कारण त्यानंतर न्यूझीलंडचे फलंदाज एकामागून एक बाद होत गेले आणि त्यांना सामन्यावर पकड मजबूत करता आली नाही. पण केन मात्र दुसर्या बाजूने चांगली फलंदाजी करत होता. पण त्याला दुसर्या टोकाकडून चांगली साथ मिळाली नाही आणि त्यामुळेच त्यांना विजय मिळवता आला नाही.
भारताला रिषभ पंतच्या रुपात सुरुवातीलाच मोठा धक्का बसला होता. पण त्यानंतर प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडणार्या सूर्यकुमार यादवला आज तिसर्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळाली होती. सूर्याने या संधीचं अक्षरश: सोनं करत न्यूझीलंडच्या गोलंदाजांची पिसं काढली. मैदानातील सर्वच भागात फटकेबाजी करत सूर्यकुमारने सामन्याच्या 19 व्या षटकात शतक साजरं केलं. 49 चेंडूंत शतक करणार्या सूर्याने पुढील दोन चेंडूंत एक चौकार आणि षटकार खेचत आपली धावसंख्या 111 वर नेली. अखेरच्या षटकात पहिल्या चेंडूंवर कर्णधार हार्दिक पांड्याने दोन धावा घेतल्यानंतर दुसर्या चेंडूवर तो बाद झाला. तर नंतरच्या तीन चेंडूंवर न्यूझीलंडचा अनुभवी गोलंदाज टीम साऊथी याने भारताचे सलग तीन फलंदाज बाद करत हॅट्रिक घेण्यात यश मिळवलं.