| माणगाव | सलीम शेख |
माणगाव शहरातील मोर्बा रोड परिसरात सामाजिक संघटना आणि वनविभागाच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात दुतर्फा वृक्षलागवड करण्यात आली होती. भविष्यात हा परिसर हिरवागार व्हावा, प्रदूषण कमी व्हावे आणि पुढील पिढ्यांना शुद्ध पर्यावरण मिळावे, या उदात्त हेतूने लावलेली ही कोवळी रोपे काही अज्ञात समाजकंटकांनी लावलेल्या वणव्यात होरपळून गेली.
आगीच्या तीव्र झळांमुळे अनेक रोपांची पाने, फांद्या आणि नाजूक पालवी पूर्णपणे जळून खाक झाली होती. काही रोपे अक्षरशः मरणासन्न अवस्थेत उभी होती. उन्हाच्या तीव्र झळा, पाण्याचा अभाव आणि आगीचा तडाखा यामुळे ही हिरवी स्वप्ने संपुष्टात येणार की काय, अशी भीती निर्माण झाली होती. ही विदारक परिस्थिती पाहून पत्रकार अरुण पवार यांचे मन हेलावून गेले. ही झाडे बोलू शकत नाहीत, पण त्यांनाही जगायचे आहे, या भावनेतून त्यांनी या कोवळ्या रोपांना वाचवण्याचा निर्धार केला. परिसरात पाण्याची कोणतीही सोय नसतानाही त्यांनी हार मानली नाही. मोर्बा रोडवरून दररोज मोठ्या संख्येने पर्यटक आणि वाहनचालक प्रवास करतात. अनेक जण अर्धवट पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या रस्त्याकडेला फेकून देतात. इतरांसाठी तो फक्त कचरा होता; पण अरुण पवार यांनी त्यातच जीवन शोधले. त्यांनी परिसरातील फेकून दिलेल्या बाटल्या गोळा केल्या आणि त्यामधील उरलेले पाणी या तहानलेल्या रोपांच्या मुळाशी घालण्यास सुरुवात केली.
कचऱ्यात फेकलेल्या त्या काही थेंब पाण्याने आता चमत्कार घडवायला सुरुवात केली आहे. जळून गेलेल्या रोपांना पुन्हा नवी पालवी फुटू लागली आहे. मृतप्राय वाटणाऱ्या झाडांमध्ये पुन्हा जीवन संचारत आहे. या रोपांच्या वाढत्या हिरवाईतून पर्यावरण वाचवण्याची आशा पुन्हा जागी होत आहे. या उपक्रमातून इच्छाशक्ती असेल तर टाकाऊ वस्तूंमधूनही जीवन फुलवता येतेफफ हा प्रेरणादायी संदेश समाजासमोर आला आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत अशाच पद्धतीने फेकून दिलेल्या बाटल्यांतील पाण्याचा वापर करून या झाडांचे संवर्धन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू ठेवणार असल्याचे अरुण पवार यांनी सांगितले.
विशेष म्हणजे, यापूर्वीही त्यांनी मोर्बा रोडवरील झाडांच्या रोपांना काठ्या बांधून संरक्षण दिले होते. वादळामुळे निपचित पडलेल्या झाडांना टेकू देऊन पुन्हा उभे करण्याचे कामही त्यांनी गुरू माऊली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने केले होते. आज एका पत्रकाराने केवळ बातम्या मांडण्यापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरण संवर्धनाचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. त्यांच्या या संवेदनशील आणि नि:स्वार्थ उपक्रमामुळे अनेक नागरिक प्रेरित होत असून, प्रत्येकाने एक झाड जगवले तर भविष्यातील पिढ्यांना हिरवेगार जीवन मिळेल, असा संदेश या कार्यातून दिला जात आहे.
वणव्यात होरपळलेल्या रोपांना मिळाले नवजीवन
