| उरण | प्रतिनिधी |
पाण्याचे संकट ओढवल्यानंतर प्रशासनाच्या नावाने बोटे मोडण्यापेक्षा संकट येण्याआधीच पाण्याचे स्रोत जतन करण्याचा आदर्श उपक्रम सारडे विकास मंच उरणच्या वतीने हाती घेण्यात आला आहे. भविष्यातील पाणीटंचाईचा धोका ओळखून सारडे गावातील घोळ परिसरातील जुन्या पाणवठ्यांची स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत महिला मजुरांच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या पाणवठ्यांमधील माती, दगड आणि साचलेला कचरा काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
एकेकाळी संपूर्ण सारडे गावाची तहान भागविणारे हेच पाणवठे नळपाणी योजना सुरू झाल्यानंतर दुर्लक्षित झाले होते. अनेक वर्षे सफाई न झाल्याने पाणवठे माती-दगडांनी भरले होते, तर परिसरात काटेरी झुडपे आणि कुयलीच्या वेलींचे साम्राज्य निर्माण झाले होते. मात्र, भविष्यात पाण्याची टंचाई निर्माण झाल्यास जुन्या जलस्रोतांचा उपयोग व्हावा, या दूरदृष्टीतून सारडे विकास मंचाने हा पुढाकार घेतला आहे. या कामासाठी कोमनादेवी ऑक्सिजन पार्कमध्ये सातत्याने मजुरी करणाऱ्या महिलांना सहभागी करून घेण्यात आले आहे. यावेळी ज्योती घरत यांच्या माध्यमातून मजुरीची व्यवस्था करण्यात आली, तर माजी ग्रामपंचायत सदस्या भगवती पाटील आणि नितीन म्हात्रे यांच्यावतीने इतर व्यवस्था करण्यात आली. या उपक्रमाचे आयोजन नितीन म्हात्रे, प्राध्यापक प्रशांत म्हात्रे, विनोद पाटील आणि सारडे विकास मंचाचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे यांनी केले आहे.
सारडेकरांची जलसंधारणासाठी धाव
