। अलिबाग । प्रतिनिधी ।
खपला खपला म्हणणाऱ्यांनो, शेतकरी कामगार पक्ष हा कधीही संपणार नाही. शेतकरी कामगार पक्ष हा जनसामान्यांचा पक्ष आहे. हा श्रमजीवींचा पक्ष आहे. त्यामुळे ज्यांनी तत्त्वानं हा पक्ष सांभाळलाय, त्यांना आव्हान देण्याचे काम आमच्या शेजाऱ्यांनी करु नये, असे खुले आव्हान शेकापच्या राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे यांनी देत मेळाव्याला नाना पाटील यांच्या युद्धभूमीवरुन सुरुवात झाली आहे. सरदार निवडले गेले असून, आजपासून युद्धाला सुरुवात झाली आहे, अशी वाघिणीची डरकाळीच ॲड. म्हात्रे यांनी फोडली. शेतकरी कामगार पक्ष रायगड जिल्हा पक्ष संघटना आणि विविध जन आघाड्यांचा पदाधिकारी निवड मेळावा रविवारी (दि.18) सायंकाळी पेझारी येथील भैरवनाथ युवक मंडळ पटांगणात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, पेझारीच्या भैरवनाथाच्या साक्षीने हा मेळावा याठिकाणी घेण्याचे काम पेझारीतील कार्यकर्त्यांनी केले आहे. खारेपाटाने ठरवले मेळावा होईल, तर नाना पाटील यांच्या युद्धभूमीवरुनच होईल. आणि, खऱ्या अर्थाने युद्धाला आजपासून सुरुवात झाली आहे. सरदार निवडले गेलेले आहेत. पक्षात महिलांच्या खांद्यावर जबाबदारी देण्याचे काम भाईंच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे. त्यामुळे महिलांनो, कमरेला पदर खोचून कामाला लागा, असे आवाहनही त्यांनी महिलांना केले. जोपर्यंत लाल बावटा दिमाखात डोलणार नाही. शपथ घेतो, तोपर्यंत झोपणार नाही. रात्र वैऱ्याची आहे. विजय नेतृत्वाच्या पायाजवळ आला पाहिजे. पदाला न्याय द्यायचा आहे. हरवलेले वैभव पुन्हा साध्य करायचे आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन ॲड. म्हात्रे यांनी केले आहे. तसेच जयंत पाटील यांनी दिलेली जबाबदारी, दाखविलेला विश्वास साध्य करायचा असेल, तर नेटाने काम करावे लागेल. महिला कार्यकर्त्यांनी पुरुष कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करुन सिद्ध करावे लागेल, तळागाळातील लोकांवर अन्याय होतोय, त्याविरोधात आवाज उठवावा लागेल. येत्या निवडणुकांमध्ये हे रणांगण मारायचे आहे, त्यासाठी सर्वांनी सिद्ध व्हायचे आहे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

निष्ठावंतांनी पक्षाची ताकद दाखवून दिलीः सुरेश खैरे
ज्यांना पक्षाने मोठे केले, विविध पदे दिली, ती नेतेमंडळी आज पक्ष सोडून गेली आहेत. परंतु, पक्षाचा तळागाळातील निष्ठावंत कार्यकर्ता आजही पक्षासोबत आहे, त्यांनी पक्षाची ताकद दाखवून दिली आहे, असा विश्वास शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांनी व्यक्त केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, आज ज्या-ज्या पदाधिकाऱ्यांची जनआघाड्यांवर निवड झाली आहे, ते पक्षसंघटना वाढीसाठी काम करतीलच, शिवाय गोरगरीबांच्या अडीअडचणी सोडविण्याचेसुद्धा काम करतील. जर सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी चांगले काम केले, तर निश्चितच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पक्षाला चांगले यश मिळेल. विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील आणि बाळाराम पाटील यांनी रायगड जिल्ह्याचा दौरा करण्याचे ठरवून संवाद मेळावे घेतले. त्यास कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यावेळी भाईंजवळ इच्छा व्यक्त केली की पक्षसंघटनेत अमूलाग्र बदल करायचा आहे. तरुणांना संधी द्यावी. पक्षाचे विविध आघाड्या, संघटन निवडीचे आवाहन केले होते. जिल्ह्याचा मेळावा घेऊन निवड जाहीर करुया. हा मेळावा अलिबागमध्ये पेझारी येथे घेण्याचे ठरले. जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या पेझारी गावाची निवड मेळाव्यासाठी केल्यामुळे कार्यकर्त्यांना एक वेगळी उमेद मिळाली आहे, असे देखील सुरेश खैरे म्हणाले.