। अलिबाग । प्रतिनिधी ।
फुले, शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पाय या पेझारी-आंबेपूर नगरीला लागले होते; ज्यांच्या घरी म्हणजे नारायण नागू पाटलांसोबत ज्यांनी भाकरी तोडली होती. ज्यांच्या विचाराने प्रेरित होऊन शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली. आप्पासाहेबांचे, बाबासाहेबांचे ते विचार, ही डावी विचारसरणी बाजूला सारुन जातीयवाद, धर्मांध उजव्या विचारसरणीकडे वळलेल्या काही विचारांना आज शेतकरी कामगार पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सणसणीत कानफटात लगावली आहे, अशा सडेतोड आणि स्पष्ट शब्दात ॲड. गौतम पाटील यांनी पक्ष बदलणाऱ्यांचा समाचार घेतला. शेतकरी कामगार पक्ष रायगड जिल्हा पक्ष संघटना आणि विविध जन आघाड्यांचा पदाधिकारी निवड मेळावा रविवारी (दि.18) सायंकाळी पेझारी येथील भैरवनाथ युवक मंडळ पटांगणात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
पुढे ते म्हणाले की, शेतकरी कामगार पक्ष हा विचारांनी चालणारा पक्ष आहे. पक्ष मोठा असतो. पक्षामुळे माणूस मोठा होतो. पक्ष तुम्हाला विविध पदे देतो, म्हणून तुम्ही असता. तुमच्यामुळे पक्ष नसतो. आप्पासाहेबांची चौथी पिढी म्हणून मी तुमच्यासमोर उभा आहे. जयंत पाटील यांनी माझ्यावर जी नवी जबाबदारी दिली आहे, ती तुमच्या साथीने पार पडण्याचा मी या ठिकाणी संकल्प करत आहे. अलिबाग, पेण, पनवेलमध्ये जी डेव्हलपमेंट झाली आहे, त्यामध्ये स्थानिक भूमीपुत्राला शेतकरी पक्षाने न्याय देण्याचे काम केले. यापुढेही येणाऱ्या डेव्हलपमेंटमध्ये भूमीपुत्राच्या बाजूने उभे राहण्याचे काम शेतकरी कामगार पक्ष पाठीशी राहील, याची खात्री ॲड. पाटील यांनी दिली. पक्षाची ओळख लढावू म्हणून असून, आपण कधीही कच खात नाही. पराभवनाने खचत नाही, हे येथे खारघरपासून पोलापूरपर्यंतच्या हजारो कार्यकर्ते याठिकाणी उपस्थित राहून पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. निष्ठावान कार्यकर्त्यांची अशीच साथ लाभली तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शेतकरी कामगार पक्ष नंबर एकच पक्ष असेल, असा विश्वासही ॲड. गौतम पाटील यांनी व्यक्त केला आहे.
शेकापला अनुकूल वातावरणः एस.व्ही. जाधव
रायगड जिल्ह्याला छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महापुरुषांचे पाय लागले आहेत. त्यांच्या विचारांवर काम करणारा पक्ष म्हणजे शेतकरी कामगार पक्ष होय. रायगडची नेतेमंडळी रायगडात शेकापचा लाल बावटा जोमाने फडकवत ठेवण्यात समर्थ आहेत. आज महाराष्ट्रात शेतकरी कामगार पक्षाच्या विचाराला अतिशय अनुकूल वातावरण आहे, असा विश्वास एस.व्ही. जाधव यांनी व्यक्त केला. राज्यातील व्यापारी, शेतकरी, तरुण, महिला, तरुणी, दीनदलित, अल्पसंख्याक, आदिवासी यांचे जीवन-मरणाचे जे प्रश्न आहेत, ते प्रश्न घेऊन झगडण्यासाठी, भांडण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाशिवाय कोणताही पक्ष नाही. त्यासाठी ते आज आपल्या पक्षाकडे आशेने पाहात आहेत, असेही जाधव म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्यात आगामी काळात पक्षाला उज्ज्वल भविष्य आहे, असेही ते म्हणाले. आपले विचार मांडताना जाधव यांनी पक्षात काम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांचे कौतुक केले. दरम्यान, त्यांनी बाळाराम पाटील आणि चित्रलेखा पाटील यांच्या कामाचा गौरवदेखील केला. तसेच, शेकापला बाळाराम पाटील ही मोठी देणगी आहे. नेतृत्वाचा आविर्वाभाव न आणता, जनतेच्या हृदयात स्थान मिळविलेला असा नेता म्हणजे बाळाराम पाटील होय. त्याचप्रमाणे चित्रलेखा पाटील या कामाच्या माध्यमातून जनतेच्या मनामनात, घराघरात गेल्याचे त्यांनी उदाहरणादाखल सांगितले. आज सर्वसामान्य जनता त्यांच्याकडे आशेने पाहात असल्याचेही ते म्हणाले. ॲड. मानसी म्हात्रे, अतुल म्हात्रे यांच्या कार्याचेही त्यांनी कौतुक केले.