| माणगाव | सलीम शेख |
तालुक्यातील मौजे बोरघर आदिवासीवाडी येथे गळ्यावर कोयत्याने वार करून वृद्धाची हत्या केल्याची घटना रविवारी (दि.18) रोजी रात्री 8.40 वा.च्या सुमारास घडली. या घटनेची तक्रार चंद्रकांत दौलत मुकणे (19) रा. बोरघर आदिवासीवाडी यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत मुकणे हे घरात एकत्रित जेवण करीत असताना अक्षय चंद्रकांत मुकणे (25) याने शाबी दौलत मुकणे रा. बोरघर आदिवासीवाडी यांना शिवीगाळ केली म्हणून शाबी यांनी विचारले असता अक्षय मुकणे अरेरावी करू लागला. भिमसेन दगडू मुकणे (70 ) यांनी अक्षय याला काठीने मारहाण केली. त्यावेळी अक्षयने त्याच्या कमरेला असलेल्या कोयत्याने भीमसेन मुकणे यांच्या गळ्यावर वार करून गंभीर दुखापत केली त्यात त्यांचा मृत्यु झाला. या घटनेची माहिती समजताच तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी, माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बेलदार, पोलीस उपनिरीक्षक चव्हाण, काळे यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बेलदार हे करीत आहेत.