| मुंबई | वार्ताहर |
केईएम रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या 13 वर्षीय मुलीचा आणि 59 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मात्र, या दोन्ही रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे नव्हे तर इतर गंभीर आजारामुळे झाल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आला आहे. 13 वर्षीय चिमुकली मूत्रपिंडाच्या आजाराने तर 59 वर्षीय महिला कर्करोगाने त्रस्त असल्याने दाखल केले होते. दोघीच्याही मृत्यू त्यांच्या मूळ आजारांमुळे झालेले आहेत, असे केईएम रुग्णालयाचे उपअधिष्ठाता डॉ. मोहन देसाई यांनी सांगितले.
मृत रुग्णांवर मूत्रपिंड व कर्करोगाचे उपचार सुरू होते. तिच्या मृत्यूचे कारण मृत्यू प्रमाणपत्रात ज्या आजारावर उपचार सुरू होते. त्याच आजाराने मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. उपचारादरम्यान आम्ही सर्व तपासणी करतो त्यातच आम्ही कोविडची देखील तपासणी केली होती, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करताना कोविडचा प्रोटोकॉल पाळत त्यांना मृतदेह कोविड बॅगमधून देण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. करोनानंतर रुग्णालयामध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक रुग्णाची आरटीपीसीआर चाचणी करण्याचा नियम झाला आहे. करोना आता सर्वसाधारण तापासारखा आजार झाला आहे. ज्यांना श्वास घेण्यास त्रास, खोकला किंवा गंभीर सर्दी आहे त्यांच्यात सामान्यतः करोनाचे विषाणू आढळत असल्याने त्यांचा अहवाल बाधित येतो. त्यामुळे हा विषाणू परत आला आहे किंवा तो पुन्हा पसरत आहे, असा त्याचा अर्थ होत नाही. या महिलेच्या व मुलीच्या मृत्यू प्रमाणपत्रावर मृत्यूचे कारण करोना हे नसून ते वेगळे आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही, असे केईएम रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोहन देसाई यांनी सांगितले.