धोदाणीत सरपंच उतरले गटारात

स्वच्छतेचा दिला अनोखा संदेश

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल तालुक्यातील धोदाणी गावात स्वच्छतेच्या प्रश्नावर सरपंचांनीच थेट गटारात उतरून साफसफाई केल्याची घटना घडली आहे. ग्रुप ग्रामपंचायत मालडुंगे अंतर्गत येणाऱ्या धोदाणी गावात काही नागरिकांकडून गटारात प्लास्टिक व कचरा टाकला जात असल्याने पावसाळ्यात पाणी तुंबण्याची समस्या निर्माण झाली होती. वारंवार सूचना देऊनही नागरिकांकडून दुर्लक्ष होत असल्याने सरपंच सीताराम चौधरी यांनी स्वतः फावडे हातात घेत गटार साफ करत नागरिकांना स्वच्छतेचा संदेश दिला.

ग्रामपंचायतीकडून नाल्यांचे काँक्रिटीकरण आणि स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात येत असतानाही गटारात टाकला जाणारा कचरा नदी व धरणाच्या पाण्यात मिसळून पर्यावरणाचा प्रश्न निर्माण होत असल्याचे समोर आले आहे. सरपंचांच्या या कृतीचे परिसरात कौतुक होत असून, स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असा संदेश त्यांनी कृतीतून दिला.

Exit mobile version