| माथेरान | प्रतिनिधी |
आपल्या मागण्यांची पूर्तता होत नसल्याने स्वच्छता घनकचरा व्यवस्थापन कंत्राटी कामगारांनी तीन दिवसांपासून काम बंद केल्यामुळे गावात घाणीचे साम्राज्य पसरले असून, विविध ठिकाणी दुर्गंधी येत असल्याने विशेषतः मटण मार्केट भागात नाक मुठीत धरून जावे लागत आहे. तर घरोघरी कचरा गोळा करणारे कामगार सुध्दा कचरा नेत नसल्याने अखेरीस आजूबाजूच्या गटारात कचरा टाकला जात आहे. मुख्य बाजारपेठ मध्ये सुध्दा सुका कचरा काहींनी नाईलाजाने रस्त्याच्या कडेला ठेवला आहे. परंतु रेस्टॉरंट, हॉटेलमधील ओला कचरा गोळा न केल्याने दुर्गंधी पसरली आहे. याबाबत समाज माध्यमांवर कचऱ्याचे फोटो येत असून प्रशासनाने याबाबत लवकरात लवकर पर्यायी व्यवस्था निर्माण करून कचरा उचलण्यात यावा. सणा सुदीच्या दिवसात अशा प्रकारे कामगार वर्गाने नागरिक व पर्यटकांना वेठीस धरणे योग्य नाही. मुख्याधिकाऱ्यांनी सर्व बाबीचा विचार करून योग्य तो मार्ग काढावा किंवा पर्यायी व्यवस्था तयार करावी, घनकचरा व्यवस्थापनेतील कर्मचाऱ्यांचा संप सुरु असल्याने गेल्या तीन दिवसांपासून ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांच्या घरातील कचरा तसाच पडून आहे. प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन संबंधित ठेकेदार व कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करून त्यांच्या मागण्या रास्त असल्यास त्यावर तोडगा काढावा व नागरिकांना भेडसावणारी ही समस्या दूर करावी अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.






