सतीश वाघ यांचा वन्यप्राणी दत्तक योजनेत सहभाग

। चिपळूण । वार्ताहर ।
बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातर्फे एका वर्षासाठी प्राण्यांचे वन्यप्राणी दत्तक योजना राबवण्यात येत आहे. या योजनेत सहभागी लोटे औद्योगिक वसाहतीतील सुप्रिया लाईफ सायन्सचे व्यवस्थापकीय संचालक,प्रसिद्ध उद्योजक सतीश वाघ यांनी तेथील वाघ आणि सिंह यांचे वर्षभरासाठी पालकत्व स्वीकारले आहे. उद्यानाच्यावतीने वर्षभरासाठीची ही योजना ऑगस्टपासून सुरू करण्यात आली आहे.प्राणी दतक घेणार्‍यांना त्यासंबंधीचे प्रमाणपत्र दिले जाते आणि ते प्राण्यांच्या पिंजर्‍यावरही लावले जातात. दर 15 दिवसांनी संबंधित प्राण्याला काही अंतरावरून पाहण्याची संधी त्याच्या आर्थिक पालकांना दिली जाते. किमान एका वर्षासाठी प्राण्यांचे आर्थिक पालकत्व घेता येते. त्यामुळे प्राण्यांच्या संगोपनाच्या खर्चाला हातभार लागतो शिवाय नागरिकांनाही वन्यजीवन विषयी चे प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळते. 8 ते 10 लाख रुपये वार्षिक खर्च वाघासाठी येतो. दत्तक योजनेतून 3 लाख 10 हजार रुपये घेतले जातात. या योजनेत राजकीय चित्रपट सृष्टीसह विविध क्षेत्रातील नामवंत मंडळी सहभागी झालेली आहेत. यामध्ये आता उद्योजक सतीश वाघ यांनीही वर्षभरासाठी उद्यानातील बाजीराव वाघासाठी 3 लाख 10 हजार रुपये तर या सिंहासाठी 3 लाख रुपये भरून या दोघांचे पालकत्व कंपनी आणि विश्‍वस्त असलेल्या सतीश वाघ फाउंडेशन तर्फे स्वीकारले आहे.

Exit mobile version