| कोपेन्हेगन | वृत्तसंस्था |
तयारी तर चोख केली होती; परंतु त्याची अंमलबजावणी आम्हाला योग्यरीत्या करता आली नाही, असे आपल्या पराभवाचे विश्लेषण सात्त्विकराज आणि चिराग शेट्टी यांनी केले आहे. जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपदाची अपेक्षा असलेल्या या भारतीय जोडीचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले.गतस्पर्धेत भारताच्या या जोडीने पदक मिळवले होते. यंदाही त्यांच्याकडून पदकाची अपेक्षा होती; परंतु डेन्मार्कच्या किम अस्त्रुप आणि अँड्रिस रासमुसेन यांच्याकडून त्यांचा धक्कादायक पराभव झाला.
जागतिक क्रमवारीत दुहेरीत सध्या दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सात्त्विक आणि चिराग यांनी गतवर्षी ब्राँझपदक जिंकले होते. यंदा उपांत्यपूर्व सामन्यात मात्र ते आपला वेगवान खेळ करू शकले नाहीत. 11 व्या मानांकित असलेल्या डेन्मार्कच्या जोडीकडून त्यांचा दोन गेममध्येच आणि अवघ्या 48 मिनिटांत पराभव झाला. माझ्या मते आमच्याकडून अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली नाही. आम्ही खराब खेळ केला, हे मान्य करावे लागेल; पण आम्ही सहजासहजी हार स्वीकारली नाही. कडवी लढत दिली. मुळात आमची मानसिकता कमी पडली, असे सात्त्विकने सांगितले.
सात्त्विक काही शानदार फटके मारून आव्हान जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत होता; परंतु चिरागचे खेळावर नियंत्रण नव्हते. बचावात त्याच्याकडून सोप्या चुका होत होत्या. पहिल्या गेमध्ये भारताच्या या जोडीने पिछाडीवरून 15-15 अशी बरोबरी साधली होती; परंतु मोक्याच्या क्षणी त्यांनी पकड गमावली आणि संधी असतानाही हा गेम गमावला. चिराग म्हणतो, आम्हाला लय सापडलीच नाही. मी स्वतः क्षमतेनुसार खेळ करू शकलो नाही. खेळात कधी कधी असे घडते एखादा दिवस तुमचा नसतो. प्रयत्न करूनही क्षमतेनुसार खेळ होत नसतो; पण यातूनही शिकता येते, या पराभवापासून आम्ही बोध घेऊन सुधारणा करू.
सात्त्विक आणि चिराग यांनी जून महिन्यात इंडोनेशिया सुपर 1000 ही प्रतिष्ठेची स्पर्धा जिंकून मोठी प्रगती केली होती. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या या उपांत्यपूर्व सामन्यात यजमान देशाच्या खेळाडूंना जोरदार पाठिंबा दिला. त्यांच्या नावाचा सातत्याने घोष केला जात होता.