। अलिबाग । प्रतिनिधी ।
मुलींच्या शिक्षणाची गळती रोखण्याबरोबरच मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी रायगड जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून इतर मागासप्रवर्गातील 9 हजार 524 विद्यार्थिनींच्या थेट खात्यात 3 हजार रुपयांप्रमाणे रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे ही योजना शिक्षणाला उभारी देण्यासाठी मुलींसाठी वरदान ठरण्याची शक्यता आहे.
ग्रामीण भागात वाहनांची वर्दळ कमी असल्याने तसेच काहींची घरची परिस्थिती बिकट असल्याने मुलींना शिक्षण घेण्यास अडथळे निर्माण होतात. परंतु, मुलगी शिकली पाहिजे, मुलीचे शिक्षण झाले पाहिजे, शाळेतील मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढले पाहिजे, ही भूमिका घेत रायगड जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आले आहे. सावित्रीबाई फुलेंनी अनेक अडचणींवर मात करत मुली शिकल्या पाहिजेत, या भूमिका ठेवत स्वतः शिकल्या आणि इतरांनाही त्यांनी शिकविले. त्यांचा आदर्श मुलींपर्यंत पोहोचून ही योजना सुरु करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील शाळांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. जिल्ह्यातील 9 हजार 524 मुलींचे प्रस्ताव जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाला प्राप्त झाले आहेत. प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार, जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्गातील मुलींना निधीची तरतूद करण्यात आली असून, त्यांना वितरण करण्याचे काम सुरु केले आहे. त्यात पहिली ते सातवीच्या 6 हजार 319 विद्यार्थिनींना 57 लाख 39 हजार 200 रुपये व आठवी ते दहावीच्या 3 हजार 205 विद्यार्थिनींना 63 लाख 21 हजार रुपयांचा निधी वितरीत केला जाणार आहे. जिल्ह्यातील या विद्यार्थिनींच्या खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्यास सुरुवात केली असून, लवकरच सर्व विद्यार्थिनींच्या खात्यात ही रक्कम जमा होण्याची शक्यता आहे, असे जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडून सांगण्यात आले आहे. अडीच व तीन हजार रुपये प्रमाणे देण्यात येणार्या शिष्यवृत्तीचा या विद्यार्थींना काही प्रमाणात आर्थिक आधार मिळण्याची शक्यता आहे.
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीवर दृष्टीक्षेप
वर्ग | निधी | विद्यार्थिनींची संख्या | |
पहिली ते सातवी | 57,39,200 | 6,319 | |
आठवी ते दहावी | 63,21,000 | 3,205 | |
एकूण | 1,20,60,200 | 9,524 |